Mon, Oct 21, 2019 03:52होमपेज › Kolhapur › इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची रेल्वेखाली आत्महत्या

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 12:34AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अभियांत्रिकीचा पेपर अवघड गेल्याने राहुल भैरवनाथ पारेकर (वय 25, रा. पांगरेगाव, करमाळा, सोलापूर) या विद्यार्थ्याने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मृताच्या खिशातील चिठ्ठीवरून तो परीक्षेच्या तणावाखाली असल्याचे समोर आले.टेंबलाई उड्डाणपुलापासून काही अंतरावर राहुलचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आला. महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या चालकाने हा मृतदेह पाहून पोलिसांना वर्दी दिली. खिशातील मोबाईल व आधारकार्डद्वारे त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या मित्रांशी संपर्क साधून घटनास्थळी बोलविण्यात आले होते. राहुलच्या मित्रांनी त्याचा मृतदेह ओळखला.

राहुल पारेकर बी.ई.च्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. शुक्रवारी त्याने सीएनटीपीएस विषयाचा पेपर दिला होता. चार मित्रांसोबत खोली भाड्याने घेऊन तो राहत होता. शुक्रवारी बँकेचे काम असल्याचे कारण सांगून तो बाहेर पडला होता. त्याचे मित्र रात्री उशिरापर्यंत त्याच्याशी संपर्क साधत होते; पण काम आटोपून आपण येतो, असेच तो मित्रांना सांगत होता.

शनिवारी सकाळी टेंबलाई उड्डाणपुलाजवळ मृतदेह मिळून आला. मृताच्या खिशात पॅनकार्ड, आधारकार्ड, एटीएम सापडले. तसेच खिशातील मोबाईलवर मित्रांचे फोन येत होते. यावरून पोलिस हवालदार सुनील नीळकंठ, सदाशिव पाटील यांनी राहुलच्या मित्रांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. राहुलच्या घरच्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. राहुल मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पांगरे गावचा राहणारा आहे. त्याच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी राहुल अशाचप्रकारे अचानक गायब झाला होता, असे त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले.

पेपर अवघड गेल्याने कृत्य

मृताच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीत ‘आजचा पेपर अवघड गेल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. ताण सहन न झाल्याने मला हा मार्ग निवडावा लागला, याला कोणीही जबाबदार नाही’, असा मजकूर लिहिला होता. ही चिठ्ठी पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतली आहे. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19