Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Kolhapur › इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 1:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

खंडणीसाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून 30 हजार रुपये उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी भरदुपारी शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा परिसरातून अतुल भीमराव प्रज्ञावंत (वय 21, रा. नागाळा पार्क) याचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते. त्याला मारहाण करून एटीएमवर नेण्यात आले. तेथे त्याच्या खात्यावरील 25 हजार रुपये संशयितांनी काढून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बारा तासांच्या आत राजवाडा पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. 

संतोष नारायण मंझाले (25), प्रदीप बळीराम मस्के (32, दोघे रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर), सागर अजित गवंडी (25, रा. निर्माण चौक परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतुल प्रज्ञावंत त्याच्या मैत्रिणीसोबत शिवाजी पेठेत आला होता. यावेळी संतोष मंझाले दोघा साथीदारांसोबत तेथे आला. दोघांची तोंडओळख आहे. अतुलला दमदाटी करून 30 हजार रुपये खंडणीची मागणी केली. त्याला जबरदस्ती त्याच्याच मोटारसायकलवर बसवून देवकर पाणंद येथे नेण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या बँक खात्यावरून 25 हजार काढून घेतले. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. रात्री उशिरा अतुल जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आला. त्याने घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांना सांगितला. 

सीसीटीव्ही फुटेजची मदत
अतुलने सांगितलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन माहिती घेतली. तसेच देवकर पाणंद येथीलही सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. केसांची स्टाईल व वर्णनावरून यातील दोन संशयित संभाजीनगरातील असल्याचे समोर आले. 

सापळा रचून अटक
संशयित आरोपी सुधाकर जोशी नगरातील असल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तिघांनी खंडणीची कबुली दिली असून, पैसे वाटून घेतल्याचे सांगितले. 
कारवाईत राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाचे एपीआय किरण भोसले, परशुराम गुजरे, प्रीतम मिठारी, नितीन कुराडे, संदीप बेंद्रे यांनी सहभाग घेतला.