Sun, May 26, 2019 16:53होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलाची केली एन्डोस्कोपी 

शिवाजी पुलाची केली एन्डोस्कोपी 

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 12:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघातानंतर पुलाच्या अंतर्गत भागात काय इजा झाली आहे का, दगड भराव निखळला आहे का, याची शहानिशा करण्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटअंतर्गत  ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाची गुरुवारी अत्याधुनिक मशिनद्वारे एन्डोस्कोपी करण्यात आली. दरम्यान, शनिवारी रडार मशिनद्वारे पुलावरील भरावाची अंतर्गत पाहणी केली जाणार आहे. पुलावरील वाहतूक सुरू राहणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे व्ही. जी. गुळवणी आणि संपत आबदार यांनी सांगितले. आठ दिवसांत अहवाल दिला जाणार आहेत. 

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा पुलावरील ब्रिटिशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे  काम ध्रुव कन्सल्टन्सीमार्फत नवी मुंबई येथील स्ट्रकवेल डिझायनर्सतर्फे बुधवारपासून सुरू आहे. स्ट्रकवेल कंपनीचे तांत्रिक संचालक जयंत कदम आणि प्रकल्प संचालक जितेंद्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक गुरुवारी दिवसभर कार्यरत होते. मेजर ब्रिज इन्स्पेक्शन युनिट ही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त मोबाईल व्हॅनच्या साहाय्याने सर्व चाचण्या करण्यात येत आहेत. मोबाईल व्हॅनची यंत्रणा रिमोट कंट्रोलवर सुरू असून पुलाचे तीन टप्प्यांत ऑडिट केले जात आहे. गुरुवारी  प्रोफाईल मॅनेजमेंट आणि एन्डोस्कोपी  या चाचण्या घेण्यात आल्या. प्रोफाईल मॅनेजमेंटअंतर्गत टोटल स्टेशन मशिनद्वारे संपूर्ण पुलाची मोजमापे घेण्यात आली. चोहोबाजूंनी पुलाच्या प्रत्येक भागाचे छायाचित्र, चलचित्र आणि मोजमाप अशी माहिती संकलित केली जात आहे. तसेच पुलाचे मटेरियल सँपलही घेण्यात आले आहे.  

क्रेनच्या बकेटमधून जयंत कदम आणि कर्मचारी पुलाच्या प्रत्येक कमानीत खालील भागात एन्डोस्कोपी मशिन घेऊन गेले. प्रत्येक कमानीत पाच ते सहा ठिकाणी असे पाच कमानीत सुमारे 30 ते 35 ठिकाणी  दोन दगडांच्या जोडभागात हे मशिन घालून आतील भरावाची एन्डोस्कोपी करण्यात आली. या यंत्रणेत  पुलाच्या दगडी कमानीवरील भरावाची सूक्ष्म पद्धतीने तपासणी करण्यात आली आहे.  याबरोबरच शनिवारी स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतिम टप्पा पूर्ण केला जाणार आहे. यामध्ये रडार यंत्रणेद्वारे पुलाच्या पोटात काय आहे, भरावात काही अडचण आहे, माती निखळून पडली आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. रडार यंत्रणेद्वारे  पुलावरील रस्त्यावरून झिगझॅग पद्धतीने हे मशिन फिरवून पुलाच्या दगडी कमानी आणि रस्त्याखालील अंतर्गत भरावात काय हालचाल झाली आहे, याचा शोध घेतला जाणार असल्याचे तांत्रिक संचालक जयंत कदम यांनी सांगितले. बुधवारी जनरेटर अथवा इलेक्ट्रिक कनेक्शनसाठी वायर उपलब्ध नसल्याने एन्डोस्कोपीचे काम झाले नाही. गुरुवारी मात्र नॅशनल हायवे विभागाने जनरेटरची सोय करून गुरुवारी सकाळी दहापासूनच कामास सुरुवात झाली. पुलावरील वाहतूक बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पादचार्‍यांना  सोडण्यात येत असल्याने पुलावर नागरिकांची वर्दळ दिसत होती. 

पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल ऑडिट
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी नव्या पर्यायी पुलाचेही ऑडिट करून घेण्यास सुरुवात केली. दोन दिवसांत या पर्यायी पुलाच्या विविध चाचण्यांत घेण्यात आल्या आहेत. एन्डोस्कोपी मशिनद्वारे स्लॅबची चाचणी घेण्यात आली आहे. टोटल स्टेशन मशिनद्वारे संपूर्ण पुलाची मोजमापे घेण्यात आली आहेत. आज रडार यंत्रणेद्वारे स्लॅबच्या अंतर्गत भागातील चाचणी केली जाणार आहे. शिवाजी पुलाच्या निमित्ताने पर्यायी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात येत आहे.