Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Kolhapur › शिवसेनेकडून मनपास बांगड्या

शिवसेनेकडून मनपास बांगड्या

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 11:22PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटविण्यात महापालिका प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि पळपुट्या भूमिकेच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे गुरुवारी (दि. 19) महापालिका प्रशासनास बांगड्या अर्पण केल्या. आंदोलकांनी महापालिका मुख्य इमारतीभोवती बांगड्या भिरकावत मुख्य प्रवेशद्वारातून आत बांगड्या फेकल्या. एवढेच नाही तर मुख्य प्रवेशद्वारास बांगड्या बांधण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. 

तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेच्या मालकीच्या असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या जागेतील अतिक्रमण काढावे, अशी भूमिका विविध पक्ष, संघटनांनी मांडली आहे. मात्र, राज्य शासनाने याबाबत स्थगिती दिल्याने अतिक्रमण काढण्यात आले नाही. या अतिक्रमण प्रश्‍नी महापालिका प्रशासन नाकर्तेपणाची आणि पळपुटेपणाची भूमिका घेतल्याचा आरोप करून शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली होती. महापालिका सर्वसाधारण सभेदिवशी महापालिका प्रशासनास बांगड्या देणार, असे जाहीर करण्यात आले होते. गुरुवारी सर्वसाधारण सभेपूर्वीच शिवसैनिकांनी हातगाडीवर बांगड्या घेऊन महापालिका इमारतीकडे कूच केली. 

पापाची तिकटी येथून मुख्य प्रशासकीय इमारतीभोवती बांगड्या फेकत आंदोलक मुख्य प्रवेशद्वारासमोर आले. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांसमक्ष आंदोलकांनी प्रवेशद्वारातून आत बांगड्या भिरकावल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. धनदांडग्यांना एक आणि सामान्यांना एक न्याय असा दुजभाव करू नका, असा इशारा आंदोलकांनी दिला. असा दुजाभाव करणार असाल तर अतिक्रमण विभाग बंद करावा. तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण हटविल्याशिवाय शहरातील सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढू देणार नाही. प्रसंगी वाहने पेटवू, असा खणखणीत इशारा संजय पवार यांनी दिला. न्यायालयाची सूचना धुडकावण्यात अर्थकारण काय आहे, असा संतप्‍त सवाल आंदोलकांनी केला

जिल्हाप्रमुख संजय पवार उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शुभांगी पोवार, सौ. रिया पाटील, हर्षल सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रवी चौगुले, अवधुत साळोखे, विराज पाटील, दत्ताजी टिपुगडे, दिलीप देसाई, विनोद खोत, दिलीप जाधव, सौ. गीतांजली गायकवाड, राजू पाटील, राजू यादव, शशी बिडकर, सौ. दीपाली शिंदे, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.