Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Kolhapur › तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण; आज बैठक

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण; आज बैठक

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 10 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृतपणे केलेली बांधकामे महापालिका हद्दीत येतात की उचगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतात, याबाबत नगरविकास विभागाच्या अहवालानुसार केलेल्या कार्यवाहीबाबत बैठक आयोजित केली आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईत मंत्रालयात प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित जागा महापालिकेची असल्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेने आरक्षित केलेल्या कचरा डेपो व ट्रक टर्मिनससाठीच्या जागेसह इतरत्र मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्या अतिक्रमित बांधकामांना उचगाव ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविल्यानंतर संबंधितांनी उचगाव ग्रामपंचायतीची परवानगी असल्याचे दाखविले होते. काहींनी न्यायालयात धाव घेतली होती. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत संबंधित जागा महापालिका हद्दीतच असल्याचा निकाल झाला. त्यानंतर उचगाव ग्रामपंचायतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी होऊन न्यायाधीशांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला अहवाल देण्याचे आदेश दिले.

शासनाने जिल्हा प्रशासनाला त्यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला संबंधित जागा कोल्हापूर महापालिका हद्दीतच असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार नगरविकास विभागानेही तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेचीच असल्याचा अहवाल न्यायालयात दिला. उच्च न्यायालयाने त्या अहवालातील पुराव्याच्या आधारेच संबंधित जागा कोल्हापूर महापालिकेचीच असल्याचे आदेश दिले आहेत. मग आता तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृतपणे केलेली बांधकामे कोल्हापूर महापालिका हद्दीत येतात की उचगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये येतात, याबाबत नगरविकास विभागाच्या अहवालानुसार केलेल्या कार्यवाहीबाबत बैठक का आयोजित केली आहे. स्वतःच्या अहवालावर नगरविकास विभागाला संशय आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.