Thu, Apr 25, 2019 12:12होमपेज › Kolhapur › सांगली-कोल्हापूर मार्गाला अतिक्रमणांचा विळखा

सांगली-कोल्हापूर मार्गाला अतिक्रमणांचा विळखा

Published On: Apr 06 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 12:54AMहेर्ले : वार्ताहर

कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर आजपर्यंत अपघात होऊन अनेकांचा जीव गेला तर कित्येक जण जखमी झाले आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा मार्बल दुकानदार, गूळ, काकवी, चिकन, चायनिज पदार्थांचे विक्रेते  यांच्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून हा महामार्ग पुन्हा अतिक्रमणामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या अतिक्रमणाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

कोल्हापूर-सांगली या राज्य मार्गाचा काही भाग शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे वडगाव फाट्यापर्यंत येतो. सांगली फाटा ते मौजे वडगाव फाट्यापर्यंत मोठी मार्बल बाजारपेठ असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्बलचा व्यवसाय होत असतो. त्यामुळे याठिकाणी नेहमीच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. खरेदी केलेले मार्बल वाहून नेण्यासाठी अवजड वाहने या रस्त्याच्या बाजूला लावण्यात येतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच सध्या याठिकाणी परप्रांतीय लोकांनी कामगारांसाठी व प्रवाशांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभे केले आहेत. हे स्टॉल चक्क रस्त्यावरच उभे केल्याचे पहावयास मिळत आहे. याठिकाणीही वाहतुकीची कोंडी अपघातास कारण ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी हेर्ले येथील तरुण अभिजित दिलीप बलवान (वय 25) याचा याच रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला होता. हा अपघात रस्त्यावर लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे झाला असल्याचे बोलले जात आहे. स्टॉल व्यावसायिक माल विकण्यासाठी रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना बोलावून वस्तू घेण्याचा घाट घालतात. त्यांच्या बोलावण्याकडे वाहन चालकांचे लक्ष जाऊन त्यांचा गाडीवरील ताबा सुटत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. 

सांगली फाटा हा चौक नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होत असून दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. याचा विचार करून शिरोली येथील एका उद्योजकाने लाखाची पोलिस कक्षाची केबिन भेट देऊन पोलिस ठाण्यास मदत केली; पण ही केबिन पोलिसांविना बंदच आहे. याठिकाणी शिरोली पोलिस ठाण्याने दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. परंतु, हे दोघे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महामार्गावरील येणार्‍या-जाणार्‍या लहान-मोठ्या वाहनांना अडवून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावरील रस्त्याकडील वाहतुकीस अडथळा ठरत असेलेली सर्व मार्बल बारपेठची व विविध स्टॉलची अतिक्रमणे काढून वाहतुकीस शिस्त लावावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.