होमपेज › Kolhapur › कचर्‍यातून रोजगार अन् पैसाही...

कचर्‍यातून रोजगार अन् पैसाही...

Published On: Apr 06 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 12:47AMकोल्हापूर : शेखर दुग्गी

शहरात कचर्‍याची समस्या इतकी भयावह आहे की, जागोजागी साचलेले कचर्‍याचे ढीग बघितल्यावर हे शहर आहे की कचराकोंडाळा, असा असा प्रश्‍न पडतो; पण थांबा... हे कचर्‍याचे ढीग नव्हेत तर चक्क पैशाचे ढिगारे आहेत. शहरातील ‘एकटी’ संस्थेने ते सिद्ध करून दाखविले आहे. कचर्‍यापासून पैसा निर्मितीची किमया संस्थेच्या कचरावेचक महिलांनी साध्य करून दाखविली आहे. संस्थेने गेल्या पाच महिन्यांत शहरातील 22 टन कचरा झूम प्रकल्पाकडे जाण्यापासून वाचविला आहे. 

शहरीकरण, औद्योगिकीरण आदी कारणांमुळे घनकचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. दिवसेंदिवस घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणे अवघड बनले आहे. त्यामुळे घनकचरा हा गुंतागुंतीचा प्रश्‍न बनत आहे.  कचर्‍यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट होत असून आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होऊ लागला आहे.

कोल्हापूर शहरात दररोज 180 टन घनकचरा तयार होतो. तो गोळा करून कसबा बावड्यातील झूम प्रकल्पात (डंपिंग ग्राऊंड) टाकला जातो. प्रकल्पात कचर्‍याचा ढीग वाढतच चालला आहे. कचरा व्यवस्थापनाबाबत महानगरपालिका विविध उपायोजना राबवित आहे; पण त्या तोकड्या पडत आहेत. 

पाच वर्षांत 22 टन कचरा गोळा...
‘एकटी’ संस्था गेल्या पाच  महिन्यांपासून शहरातील कचरावेचकांचे संघटन करीत आहे. सध्या 940 महिला संस्थेच्या सभासद झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 68 आणि 69 घरांचा कचरा कचरावेचक महिला जाऊन गोळा करतात. ओल्या कचर्‍यापासून मैलखड्डा परिसरात खत निर्माण केले जाते, तर सुका कचरा महानगरपालिकेने दिलेल्या सॉर्टिंग शेडमध्ये साठविला जातो. 12 भाजीपाला मार्केटमधील कचरा महिला जमा करतात व त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विलगीकरण करतात. अशा पद्धतीने गेल्या पाच महिन्यांत संस्थेने 22 टन कचरा गोळा केला आहे.

900 किलो खतनिर्मिती
जमा होणार्‍या ओल्या कचर्‍यातून संस्था आठवड्याला 900 किलो खतनिर्मिती करते. या खताला बागेला, शेतीसाठी मोठी मागणी आहे. खतातून संस्थेला महिन्याला 20 हजार रुपये मिळतात. पाच रुपये किलो दराने त्याची विक्री केली जाते. सुका कचरातून एक महिला अडीच हजार रुपये कमविते. संस्था महिलांना मानधनही देते. विचारेमळा, यादवनगर, राजेंद्रनगर, सदरबझार, फुलेवाडी, वडणगे, मुडशिंगी येथील महिला या व्यवसायात काम करतात.   

...असाही रोजगार
लग्न असो वा वाढदिवस, महोत्सव वा मेळावे अशा ठिकाणी कचरावेचक महिला स्वच्छता मोहीम राबवितात. यातून त्यांना दिवसाला 300 ते 400 रुपये मिळतात.  

आरोग्याबाबत जनजागृती...
संस्थेकडून कचरावेचक महिलांची तीन महिन्यांतून एकदा आरोग्य तपासणी केली  जाते, तसेच सहा महिन्यांतून धनुर्वातची लस दिली जाते. कचरा गोळा करण्यासाठी त्यांना मास्क आणि ग्लोजही दिले जाते. 

संस्थेने 10 कचरावचेक वस्तीत 7 बचत गटांची स्थापन केली आहे. बचत म्हणून कचरावेचक महिला 100 रुपये ठेव ठेवतात. स्वयंम रोजगारासाठी त्यांना गटातून कर्जही दिले जाते. प्रत्येक महिन्याला गटाची बैठक होते.

कचरावेचक महिलांच्या वस्तीत अभ्यासिका
कचरावेचक वस्तीत संस्थेने मुलांसाठी अभ्यासिका आणि मोबाईल लायब्ररी सुरू केली आहे. आतापर्यंत 475 मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. 220 बालकामगार मुलांना शाळेत पाठविले आहे. 
 

Tags : kolhapur, money, Employment, Garbage