Tue, Apr 23, 2019 13:34होमपेज › Kolhapur › ‘टूर्स’चे संचालक बेपत्ता; तक्रार दाखल

‘टूर्स’चे संचालक बेपत्ता; तक्रार दाखल

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दाभोळकर कॉर्नर परिसरातील एका तीन मजली इमारतीत सुरू असणार्‍या टूर्स कंपनी कार्यालयातील तिघा संचालकांसह कर्मचारी सोमवारी अचानक पसार झाल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला. देश-विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी सहल घडविण्याच्या नावाने कंपनीने कोल्हापुरात डॉक्टर, वकिलांसह अनेकांना आपले ग्राहक म्हणून नोंद केले होते. ग्राहकांनी 50 हजार ते 3 लाखांच्या घरात रकमा भरल्या असून, यापैकी काहींना कंपनीने दिलेले धनादेश वटत नसल्याने ग्राहकांत चिंता वाढली आहे. ग्राहकांनी रात्री उशिरा आपला तक्रार अर्ज पोलिसांत दिला. त्यातून तक्रारीत फसवणूक झाल्याचा संशय व्यक्‍त करण्यात आला आहे.

शहरातील प्रसिद्ध मॉल, चित्रपटगृहे या ठिकाणी थांबून कंपनीच्या काही कर्मचार्‍यांनी ग्राहकांशी संपर्क साधला. अत्यंत अल्पदरात, तसेच कॅशबॅकच्या नावाखाली देश-विदेशातील सहली घडविण्याचे आमिष दाखविले. काहींनी रोखीने, तर काहींनी एनईएफटीच्या माध्यमातून पैसे कंपनीच्या नावे भरले.

सहलीची ऑफर मिळालेल्या अनेकांनी कंपनीकडे विचारणा करत सहलीला जाण्याची तयारी सुरू केली. यावर बुकिंग फुल्‍ल आहे, हॉटेल्स उपलब्ध नाहीत, पासपोर्टचा प्रॉब्लेम आहे, अशी वेगवेगळी कारणे देत कंपनीच्या कर्मचार्‍यांनी चालढकल सुरू केली. अनेक ग्राहकांनी सहलीची ऑफर नाकारत पैसे परत मागितले. 

व्यवस्थापकाचा शोध सुरू

व्यवस्थापक म्हणून काम करणारा एक जण नागाळा पार्कात राहण्यास होता. रविवारी काही ग्राहक तिथे गेले असता, तो दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेला नाही. यामुळे त्याच्याबद्दल साशंकता वाढत चालली आहे.

कार्यालयात शिंगणापूर येथील एक तरुण ऑफिसबॉय म्हणून काम करत होता. सोमवारी ग्राहकांनी गर्दी केल्यानंतर त्याच्यावर प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला. मात्र, ग्राहकांच्या प्रश्‍नांची उत्तरे तो देऊ शकत नव्हता. तसेच कंपनीचा व्यवस्थापकही त्याचा फोन उचलत नव्हता. कंपनीच्या एका ग्राहकाने पुण्यातील व्यवस्थापकाशी संपर्क साधला. आपण 25 मेपर्यंत सर्वांचे पैसे परत करणार आहोत. आम्ही याबाबत पोलिस ठाण्याला लेखी कळविले असल्याचे त्याने फोनवरून सांगितले. आम्हाला मुदत द्या, अशी विनवणी तो करीत होता.