Tue, Apr 23, 2019 23:35होमपेज › Kolhapur › अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 25 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक करिअरचा महत्त्वाचा टप्पा असणार्‍या अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सोमवार (दि.25) पासून सुरुवात होत आहे. शहरातील 33 महाविद्यालयांतील 13,500 जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. शैक्षणिक वर्षे 2018-19 प्रवेश नियोजन समितीने प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार सोमवारपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रवेश अर्जाची किंमत 80 रु. आहे. अर्ज वितरण व संकलन वेळ 25 ते 30 जून सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 असणार आहे. 

प्रत्येक विद्यार्थ्यास एका शाखेचाच अर्ज मिळेल, अपवादात्मक परिस्थितीतच दुसर्‍या शाखेचा अर्ज मिळणार आहे. प्रवेश अर्ज विकत घेताना दहावीचे मूळ गुणपत्रक सोबत असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज कोणत्याही वितरण केंद्रावरून विकत घेता येईल व कोणत्याही संकलन केंद्रावर जमा करता येणार आहे. संकलन केंद्रावर विद्यार्थ्यांनी अर्ज दिल्यानंतर पोहोच घ्यावी व प्रवेश अंतिम होईपर्यंत ती जपून ठेवणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर केल्या जाणार्‍या 20 टक्के राखीव प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश समितीकडे प्रवेश अर्ज करणे गरजेचे आहे. अनुदानित व कायम विनाअनुदानित वर्गाची फी वेगवेगळी आहे, ही बाब विचारात घेऊन प्राधान्यक्रम निश्‍चित करावा, असे आवाहन प्रभारी शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांनी केले आहे.