Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Kolhapur › ‘दौलत’ परिसरात पाच हत्तींचा धुमाकूळ

‘दौलत’ परिसरात पाच हत्तींचा धुमाकूळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चंदगड : प्रतिनिधी

‘दौलत’ हलकर्णी येथे पाच हत्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातला. दौलत साखर कारखान्याच्या परिसरात 5 हत्तींचा दिवसभर थरार ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. सकाळी 11 वाजता आलेले हत्ती सायंकाळी 7 वाजता अथक प्रयत्नाने हुसकावून लावण्यात ग्रामस्थांना यश आले. पाच हत्तींच्या कळपाने ऊस, मळणीसाठी रचलेल्या वळ्या उद्ध्वस्त केल्या. यामध्ये अनेक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. हत्ती पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. हत्ती दोनवेळा ऊस मळ्याबाहेर आल्याने दर्शन झाले. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचार्‍यांना याबाबत कळवले होते. मात्र, टस्करच्या रुद्रावताराचा अनुभव असल्याने त्यांनी सावध पवित्रा घेतला.  

हलकर्णी येथील शेतकरी भात मळणी करीत असताना शेजारच्या ऊस मळ्यात कडा-कडा ऊस मोडतानाचा आवाज आला. प्रथम त्यांनी गायी, म्हशी उसात गेल्या असतील म्हणून डोकावून पाहिले असता हत्ती दिसल्यानंतर ही वार्ता सर्व गावभर पसरली. सर्वांनी आपापल्या घरांची दारे बंद करून घेतली. जीव मुठीत घेऊन सारे ग्रामस्थ बसले होते. गावडे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूला असलेली केळीची बाग उद्ध्वस्त करून टाकली.

7 वाजण्याच्या सुमारास हत्ती निघून गेल्यानंतर गावकर्‍यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. हलकर्णी परिसरातील अनेक शेतकर्‍यांच्या उभ्या ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, हत्ती फडातच असल्याने नक्‍की कितीजणांचे, किती नुकसान झाले, हे समजत नव्हते. इसापूर रस्त्यावरील कनवी मंदिरानजीक असलेल्या किंदळी तळ्याजवळ या हत्तींचा गेल्या आठ दिवसांपासून मुक्‍काम होता. त्यानंतर कलिवडे, आंबेवाडी, सदावरवाडी, हलकर्णी नाईक वसाहत या परिसरात दोन दिवसांपासून हत्ती होते. सायंकाळी सहा वाजल्यानंतर संपूर्ण रात्र या परिसरात या हत्तींची दहशत असते.  

या टस्कराच्या दहशतीने अत्यवस्थ रुग्ण असला तरी सकाळीच दवाखान्यात आणावे लागते. टस्कराची परिसरात इतकी दहशत आहे की, सायंकाळी घरातील दिवे बंद ठेवावे लागतात. हत्ती पिटाळण्यासाठी वनविभागाचे डी. के. जाधव, एस. व्ही. गोरे, दयानंद पाटील, एस. एस. शिंदे, मोहन तुपारे, अजित पाटील यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक राहूल पाटील, एच. एस. नाईक, दीपक पाचवडेकर, डी. एन. पाटील, संग्राम पाटील, अमोल निकम यांचे पथक तैनात होते.   

टस्करला लाईटची अ‍ॅलर्जी

गेल्या दोन वर्षांपासून या टस्करचे वास्तव्य चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांच्या पश्‍चिम भागात आहे. सन 2001 साली हत्ती आले की, वन विभागाचे कर्मचारी फटाके, बॉम्ब यांचा वापर करीत होते. या उपायाला हत्ती घाबरून परिसरात येत नव्हते. मात्र, अलीकडे एक वर्षात या कळपातील टस्कर अशा कृत्रिम उपायांना दाद देत नसल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी या टस्करला वीज बल्ब किंवा बॅटरीचा प्रकाशझोत दिसला, तर लगेच प्रकाशाच्या दिशेने धावून येतो व उजेड असलेले ठिकाण उद्ध्वस्त करून जातो. हा त्याचा नित्यनियम ठरला आहे. त्यामुळे उजेडाची अ‍ॅलर्जी या टस्करला असल्याने रात्री शेतात गेल्यानंतर कोणीही बॅटरी अथवा पेटती मशाल आपल्याजवळ ठेवत नाहीत.