Thu, Jul 18, 2019 06:40होमपेज › Kolhapur › हत्ती कँपचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

हत्ती कँपचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:11AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील जंगली हत्तीचा उपद्रव कमी करण्यासाठी हत्तींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे हत्ती कँप साकारला जाणार आहे. या कँपचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता वन विभागाने व्यक्‍त केली.

जिल्ह्यात चंदगड ते पन्हाळा या तालुक्यात सात हत्तींचे वास्तव्य आहे. आजरा, चंदगड परिसरात दोन ग्रुपमध्ये पाच हत्ती फिरत आहेत. तर राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा परिसरात दोन हत्तींचे वास्तव्य आहे. यापैकी दोन हत्ती त्रासदायक असून, त्यांना पकडून प्रशिक्षित करण्यासाठी 68 लाख 52 हजार रुपयांच्या हत्ती कँपचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 6 नोव्हेंबर रोजी हा प्रस्ताव वन विभागाच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयाला सादर करण्यात आला आहे.

कर्नाटकातील नागरहोल येथील प्रशिक्षित केंद्रातील चार हत्ती आणि माहूत यांच्या मदतीने या दोन हत्तींना पकडले जाईल. यानंतर त्यांना घाटकरवाडी येथील कँपमध्ये ठेवण्यात येईल. हे हत्ती प्रशिक्षित झाले की, हा कँप बंद केला जाणार आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत, या कालावधीत हत्ती पकडणे सोपे असते, उन्हाळा सुरू झाल्यानंतर हत्तींना पकडण्यासाठी मोठी दमछाक करावी लागणार आहे, त्यासह त्याच्या खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा, यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 

कँप वेळेत सुरू झाला नाही तर दोन हत्ती कर्नाटकातील प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्याचा वन विभागाचा विचार होता. मात्र, हे हत्ती प्रशिक्षण केंद्रात घेण्यास कर्नाटकने असमर्थता दर्शवली आहे. सध्या या केंद्रात 100 हत्ती आहेत. यामध्ये सांवतवाडी परिसरातून पाठवलेला ‘भीम’ही आहे. हा ‘भीम’ परत घेऊन जा, अशी सूचना या प्रशिक्षण केंद्राने केली आहे. यामुळे घाटकरवाडी येथील कँप लवकर सुरू होणे गरजेचे आहे.

5 मृत्यू, 17 जखमी

हत्तीचा जिल्ह्यात उपद्रव सुरूच आहे. आजअखेर हत्तीच्या हल्ल्यात जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना 9 लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे. हत्तीच्या हल्ल्यात जिल्ह्यातील 17 नागरिक विविध ठिकाणी जखमी झाले आहेत. त्यांनाही 8 लाख 33 हजार रुपयांची भरपाई देण्यात आल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

1 कोटी 83 लाख रुपयांच्या पिकांचे नुकसान

जिल्ह्यात हत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 2004 ते आजअखेर जिल्ह्यात तब्बल 1 कोटी 83 लाख रुपयांचे पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती वन विभागाने दिली. पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात आली आहे. यासह हत्तीमुळे 70 ठिकाणच्या मिळकतींचे (प्रॉपर्टी डॅमेज) नुकसान झाले आहे. मात्र, त्याची भरपाई देता येत नसल्याचेही वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.