Fri, Jul 19, 2019 00:51होमपेज › Kolhapur › कोटीची ‘सुपारी’ फुटली ‘भूमिगत’

कोटीची ‘सुपारी’ फुटली ‘भूमिगत’

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 1:09AMकोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर शहरात तब्बल 22 कोटींची विद्युत विकासाची कामे करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाकडून त्यासाठी निधी मिळाला आहे. परंतु, महापालिका सभागृहात अद्याप कामाला मंजुरी मिळालेली नाही. तरीही ठेकेदाराने बहुतांश कामे पूर्ण केली आहेत. मंजुरीसाठी प्रशासनाने तीनवेळा महासभेपुढे विषय ठेवला. तरीही कामाला मंजुरी मिळालेली नाही. अखेर गेल्या आठवड्यात ‘सेटलमेंट’ होऊन ‘कोटीची सुपारी भूमिगत फुटली’. परिणामी, येत्या सभेत हा विषय मंजूर होणार आहे. सर्वपक्षीय सेवकांना त्यासाठी प्रत्येकी 34 हजार 600 रुपयांची ‘पाकिटे’ घरपोच झाली आहेत. बाकीचा ढपला ‘कारभार्‍यां’नी हाणला असल्याची चर्चा आहे. 

कोणत्याही कामात ‘देवघेव’ झाल्याशिवाय महापालिकेतील एकही फाईल पुढे जात नाही. मग तो कितीही महत्त्वाचा आणि कोणताही विषय असू दे. विद्युत विकासकामाचा विषय तरी त्याला कसा अपवाद ठरणार? गेले काही दिवस सुरू असलेल्या विद्युत विभागाच्या कामांच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी कारभारी सरसावले होते. त्यात ठराविक अधिकार्‍यांचाही समावेश होता. त्यातूनच शहरात कामे करू देण्यासाठी कारभार्‍यांनी तब्बल कोटीची सुपारी घेतली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. कामे केली असल्याने कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात जाण्याची भीती आणि 20 सप्टेंबरला कामाची मुदत संपत असल्याने ठेकेदारानेही ‘झंजट’ नको म्हणून देऊन रिकामे झाल्याचे सांगण्यात येते.  

महापालिका म्हणजे ‘घबाड’ असेच प्रत्येक सेवकाला वाटते. महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात अनेक सेवक त्यासंदर्भात उघडपणे बोलूनही दाखवतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी व विरोधक असे दोन गट पडल्याने ‘थेट लाभ’ कुणालाच मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यातच महापालिका आर्थिक अरिष्टातून जात असल्याने विकासकामासाठीही निधी नाही. परिणामी, टक्केवारीचीही ‘टंचाई’ सुरू आहे. काय दुर्बुद्धी सुचली अन् एवढा खर्च करून महापालिकेत आलो, असेही वैतागलेले काही सेवक चौकात बोलतात. कारभारी मात्र कुणाला समजणार नाही, अशा पद्धतीने ‘आंबा’ पाडण्याच्याच तयारीत असतात. नवख्या सेवकांना मात्र त्याची काहीच कुणकुण लागत नाही. 

नवे सभागृह येऊन अडीच वर्षे उलटली. परंतु, महापालिकेला मोठ्या प्रमाणात निधी आलेला नाही. त्यामुळे वाटणी नाही. साहजिकच मोठ्या निधीचे प्रस्ताव किंवा ठराव येण्यासाठी कारभार्‍यांची मोठ्या प्रमाणात धडपड सुरू आहे. आता तर ‘आयते सावज’ मिळाल्याची भावना त्यांच्या मनात झाली आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ठेकेदाराला फुकट काम करू द्यायचे नाही, असा निर्धार करण्यात आला होता. परंतु, विजेचा ‘झटका’ बसण्याच्या भीतीने सेवकांकडून ढपल्याशिवाय मंजुरी मिळेल असा ठेकेदाराचा (गैर) समज होता. मात्र, हात ओले केल्याशिवाय मंजुरी मिळेल ती महापालिका कसली? अनेक महिने घालविल्यावर ठेकेदारालाही महापालिका कामकाजाची माहिती कळाली. काही कारभार्‍यांना परस्पर ‘आंबा’ पाडण्यासाठी धडपड चालविली होती. इतर पक्षीयांना त्याची कुणकुण लागल्यानेच वारंवार परवानगीचा विषय पुढील मिटिंगमध्ये करण्यात येत होता, अशी चर्चा नगरसेवकांत सुरू आहे. 

दरम्यान, शालिनी पॅलेस परिसरातील जागेच्या सुपारीचा भांडाफोड करणार्‍या ठराविक नगरसेवकांना पाकिटातून वगळण्यात आल्याची चर्चा आहे.

बारा कोटींचे काम एक कोटीत!
केबल खोदाईसाठी धोरण ठरलेले आहे. रस्त्याखालील केबलसाठी असलेल्या दरानुसारच खोदाईची रक्‍कम कळविली होती. निधी नसल्याने 100 रु. रनिंग फूटने परवानगीचा प्रस्ताव समोर आला. परंतु, त्याला नकार देण्यात आला. अखेर खोदाईसाठीचे 12 कोटी डिपॉझिट म्हणून भरावे, काम संपल्यावर ती रक्‍कम परत देऊ, असे मनपातर्फे कळविण्यात आले. त्यालाही नकार दिला. अखेर ठराविक अधिकारी व कारभार्‍यांतील ‘अर्थपूर्ण’ घडामोडीतून तोडगा निघाला. बारा कोटी डिपॉझिटऐवजी कोटीत काम झाल्याची चर्चा आता महापालिका चौकात सुरू आहे.

शहराच्या डोक्यावरील तारांचे जंजाळ नाहीसे होणार
कोल्हापूर शहरात प्रामुख्याने 11 केव्हीची 22 किलोमीटर उच्चदाब वाहिनी जी सध्या ओव्हरहेड आहे, ती या योजनेतून भूमिगत करण्यात येणार आहे. तसेच 58 नवीन वितरण रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी 35.68 किलोमीटर भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या डोक्यावरील तारांचे जंजाळ नाहीसे होणार आहे. तसेच अखंडित व सुरळीत वीज मिळणार आहे.