Mon, Sep 24, 2018 21:31



होमपेज › Kolhapur › उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे कृषिपंपांना वीज 

उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे कृषिपंपांना वीज 

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:26AM



कोल्हापूर : प्रतिनिधी  

राज्यात कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असणार्‍या 2 लाख 49 हजार 358 शेतकर्‍यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांपैकी 1 लाख 65 हजार 456 शेतकर्‍यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असून उर्वरित 83 हजार 902 शेतकर्‍यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

महावितरणद्वारे सर्वच प्रकारच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी, वीजजोडणीची सद्यःस्थिती, वीजबिल व वीजबिलांचा भरणा, वीज स्थगितीची सूचना, मीटर रीडिंग इत्यादी एसएमएस ग्राहकांना पाठविण्यात येतात. महावितरणने कृषिपंपाना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रणालीतील कामांना सुरुवात होणार आहे. या प्रणालीतील कामे कोणत्या टप्प्यात आहेत तसेच कृषिपंपाना वीज जोडणी देण्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे इत्यादी माहिती शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.  ज्या शेतकर्‍यांनी अद्यापही आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल त्यांनी महावितरण मोबाईल अ‍ॅप, शाखा कार्यालय किंवा  1800-102-3435/1800-233-3435/1912  या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. 

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार राज्यातील 40 लाख 68 हजार 220 कृषिपंपांना वीज जोडण्या दिलेल्या असून कृषिपंपांसाठी मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करण्यात येतो. या पद्धतीमुळे एकाच रोहित्रावरून 15 ते 20 कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीची लांबी वाढते. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्यामुळे कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा मिळणे, रोहित्र वारंवार बिघडणे, वीजपुरवठा खंडित होणे, वीजहानी वाढणे, वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व अडचणींना कायमचे सोडवून राज्यातील शेतकर्‍यांना चांगल्या दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी या प्रणालीद्वारे कृषिपंपाच्या जागेपर्यंत उच्चदाब वाहिनी उभारण्यात येणर आहे. त्यांच्या वीजभारानुसार विविध क्षमतेचे (10,16 किंवा 25 एव्हीए) रोहित्र उभारण्यात येणार आहेत. या रोहित्रावरून एक किंवा दोन शेतकर्‍यांनाच वीज जोडणी दिली जाणार असल्यामुळे या प्रणालीचा (एचव्हीडीएस) शेतकर्‍यांना  फायदाचे होणार आहे. तरी पैसे भरून प्रलंबित असणार्‍या शेतकर्‍यांनी आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी तातडीने करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.