कोल्हापूर : सतीश सरीकर
कोल्हापुरात फेब्रुवारीपासून कचर्यातून वीजनिर्मिती सुरू होणार आहे. मुंबईतील रोकेम कंपनीच्या वतीने लाईन बाजारमधील झूम प्रकल्प परिसरात सुमारे पंधरा कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर शहरात दररोज निर्माण होणार्या सुमारे 180 टन कचर्याचा प्रश्न मिटणार आहे.
कोल्हापुरातील कचर्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. 2 जुलै 2013 ला रोकेम सेपरेशन सिस्टिम लि., मुंबई यांनी निविदा भरली होती. कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपनीने 315 रु. प्रतिटन दर मागितला होता. परंतु, चर्चेअंती 308 रुपयांवर तडजोड करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक टनासाठी रोकेम कंपनीला महापालिकेकडून 308 रु. टिपिंग फी देण्यात येणार आहे. शहरात रोज सुमारे 180 टन कचरा जमा होतो. त्यामुळे वर्षाला सुमारे दोन कोटी रु. कंपनीला द्यावे लागणार आहेत. तीस वर्षांचा करार राहणार असून, दरात वाढ होणार नाही. 26 ऑगस्ट 2013 च्या महासभेत रोकेम कंपनीच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. 7 सप्टेंबरला रोकेम कंपनीला निविदा मंजुरीचे पत्र दिले. 17 सप्टेंबर 2013 ला वर्कऑर्डर देण्यात आली होती.
झूम प्रकल्पाच्या ठिकाणी सुमारे पाच लाखांहून जास्त टन कचरा साठल्याने कंपनीला प्रकल्प उभारणीसाठी जागा नव्हती. अखेर त्याच परिसरातील डांबर प्लँटजवळची जागा कचर्यापासून वीजनिर्मितीसाठी देण्यात आली आहे. सुमारे दोन एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहे.
घरगुती सुमारे 150 टन कचर्यापासून वीजनिर्मितीसाठी स्वतंत्र व हॉटेल, मटण मार्केटसह इतर ओल्या कचर्यापासून मिथेन गॅस व नंतर वीजनिर्मितीसाठी स्वतंत्र असे दोन प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. कचर्याच्या ट्रकचे वजन करणारी यंत्रणा, कचरा वाहून नेणारे कन्वेअर बेल्ट आदीसह इतर सर्व साहित्य प्रकल्पस्थळावर आले आहे. त्याच्या जोडणीचे काम महिनाभर चालणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कचर्यापासून वीजनिर्मिती सुरू करण्यात येणार आहे.
शहरात रोज जमा होणार्या कचर्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी 11 सप्टेंबर 2000 ला मे. झूम बायो फर्टिलायझर्स, मुंबई यांना 30 वर्षांचा ठेका देण्यात आला होता. त्यासाठी कसबा बावडा ड्रेनेज प्लँटजवळची आठ एकर जागा दिली होती. पाच कोटींची गुंतवणूक करून झूम कंपनीने सिव्हिल व मेकॅनिकल मशिनरीसह प्रकल्पाची उभारणी केली होती. परंतु, अवघ्या सहा महिन्यांतच झूमने गाशा गुंडाळला.
परिणामी, 15 ऑक्टोबर 2011 ला मनपा प्रशासनाने झूम कंपनीला अंतिम नोटीस बजावली. त्यानंतर झूमचे काम पूर्णत: बंद आहे. परिणामी, तेव्हापासून झूम प्रकल्पावर सुमारे पाच लाख टनांवर कचर्याचा डोंगर तयार झाला आहे. तो हलविण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.