Wed, Mar 20, 2019 22:57होमपेज › Kolhapur › वीज बिले मिळणार आता पोस्ट किंवा कुरिअरने

वीज बिले मिळणार आता पोस्ट किंवा कुरिअरने

Published On: Jul 09 2018 1:18AM | Last Updated: Jul 09 2018 12:43AMआजरा ः ज्योतिप्रसाद सावंत 

महावितरण कंपनीमध्ये महाराष्ट्रभरातील जिल्हा स्तरावरील माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे वीज बिलांची छपाई व वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला असून, ग्राहकांना यापुढे भांडुप (मुंबई) येथील मध्यवर्ती वीज बिल वितरण यंत्रणेद्वारे पोस्टाने अथवा कुरिअरने वीज बिले पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येणार आहे.

वीज वितरण कंपनीकडून संबंधित विभागातील जिल्हा पातळीवरील माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे वीज बिले छपाई करून घेतली जात होती. ही छपाई केलेली बिले एखाद्या एजन्सीद्वारे ग्राहकापर्यंत पोहोचविली जात होती. सर्वसाधारणपणे 29 ते 31 दिवसांच्या टप्प्यामध्ये वीज बिलांचे रीडिंग घेणे व या कालावधीतीलच वीज बिले ग्राहकांना देणे आवश्यक असताना काहीवेळा 29 पेक्षा कमी तर काहीवेळा 35 दिवसांपर्यंतची बिले ग्राहकांना मिळत असल्याने याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत होत्या. कालावधी वाढल्याने वापरलेल्या युनिटस्च्या बिल आकारणी स्लॅबमध्ये फरक पडून ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

या पार्श्‍वभूमीवर वीज वितरण कंपनीने जिल्हास्तरावरील बिले छपाई बंद केली आहे. आता रोजची रीडिंग घेतलेली बिले ऑनलाईन पद्धतीने भांडुप येथील मध्यवर्ती वीज बिल यंत्रणेकडे पाठविली जातील. रोजच्या रोज या बिलांची छपाई केली जाईल. व त्वरित ज्या पद्धतीने छपाई होईल त्या-त्या दिवशी संबंधित वीज बिल ग्राहकाच्या पत्त्यावर बिले पाठविली जाणार आहेत. यामधील वितरण एजन्सी कमी करण्यात आली आहे. याकरिता येणारा खर्च वीज वितरण कंपनीकडूनच केला जाणार आहे.

या धोरणात्मक बदलाची अंमलबजावणी ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. सद्यस्थितीस कोल्हापूर जिल्ह्यात 8 लाख 16 हजार 750 घरगुती, 74 हजार 828 व्यापारी, 19 हजार 700 औद्योगिक, 1 लाख 39 हजार कृषी, 2800 सार्वजनिक पाणीपुरवठा व 3200 पथदिव्यांकरिताच्या विद्युत जोडण्या आहेत. या सर्वांना ऑगस्ट महिन्याची बिले कुरिअर किंवा पोस्टाने मिळणार आहेत.

ग्राहकांना घरच्या पत्त्याची माहिती देण्याचे आवाहन

ऑगस्टपासून वीज बिले पोस्ट अथवा कुरिअरने मिळणार असल्याने संबंधित वीज ग्राहकांनी आपला संपूर्ण पत्ता, घर नं., गल्ली, कॉलनी अथवा नगर पिनकोडसहीत माहिती वीज वितरणच्या कार्यालयात द्यावी. तसेच सोबत आधारकार्ड झेरॉक्सप्रत देणे आवश्यक असल्याचे आवाहन वीज वितरण कंपनीने केले आहे.