Sun, May 26, 2019 08:48होमपेज › Kolhapur › वीज बिलप्रश्‍नी शेतकर्‍यांचा उद्या विधानभवनावर मोर्चा

वीज बिलप्रश्‍नी शेतकर्‍यांचा उद्या विधानभवनावर मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी 

राज्यातील 41 लाख कृषिपंप वीज ग्राहकांच्या बिलातील पोकळ व बोगस थकबाकी रद्द करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता आझाद मैदानातून शेतकर्‍यांचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. या मोर्चात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे. 

महाराष्ट्र राज्य एरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व जनता दल (सेक्युलर) यांच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मागण्यांना आणि मोर्चाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यातील उच्चदाब उपसा सिंचन योजनांचा दर 1.16 रुपये प्रतियुनिट निश्‍चित करण्याचे आश्‍वासन दिले होते.

तथापि, त्याची आजअखेर अंमलबजावणी झालेली नाही. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनमुळे यांनी 8 महिन्यांपूर्वी राज्यातील सर्व शेतकर्‍यांची वीज बिले तपासून दुरुस्ती केली जातील व पोकळ, बोगस थकबाकी रद्द केली जाईल, असे जाहीर आश्‍वासन दिले होते. मात्र, त्याची आजअखेर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या कृषी संजीवनी योजनेचा फज्जा उडाला आहे. बिले दुरुस्त करून दंड, व्याज व 50 टक्के मुद्दल माफ करून सुधारित कृषी संजीवनी योजना राबवून शेतकर्‍यांची वीज बिले थकबाकीमुक्‍त करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने त्वरित नवीन सवलतीचे वीज दर निश्‍चित व जाहीर करणे आवश्यक आहे. राज्यातील अंदाजे 2.5 लाख शेतकर्‍यांना तीन ते चार वर्षांपासून वीज जोडण्या मिळालेल्या नाहीत. याबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावेत, यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याचे होगाडे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या...

राज्यातील 41 लाख कृषिपंप वीज ग्राहकांच्या बिलातील पोकळ व बोगस थकबाकी रद्द करावी, थकीत मुद्दल रकमेच्या 50 टक्के रक्‍कम भरण्याची सवलत देऊन सुधारित कृषी संजीवनी योजना राबवण्यात यावी, लघुदाब व उच्चदाब सर्व कृषिपंप ग्राहकांचे सवलतीचे योग्य दर निश्‍चित करावेत, उपसा सिंचन योजनांचा वीज दर प्रतियुनिट 1.16 रुपये निश्‍चित करावा.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Ichalkaranji, farmers, Electricity bill, Front, Legislative Assembly, 


  •