Mon, Jun 24, 2019 17:06होमपेज › Kolhapur › बहुचर्चित तातोबा हांडे यांचा अर्ज अवैध 

बहुचर्चित तातोबा हांडे यांचा अर्ज अवैध 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हुपरी : वार्ताहर

हुपरी नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत शनिवारी छाननीत 9 अर्ज अवैध ठरले.  बहुचर्चित तातोबा हांडे यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने तब्बल 6 तासानंतर निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी तानाजी नरळे  यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे ताराराणी आघाडीत नाराजी पसरली.  नगराध्यक्ष पदाच्या निवडीत मात्र राष्ट्रवादीचे घड्याळ गायब झाले, तर काँग्रेसचा हातही गायबच आहे.

शुक्रवारी तातोबा हांडे यांचा अर्ज भरण्यावरून जि.प. सदस्य राहुल आवाडे व निवडणूक अधिकार्‍यांत जोरदार वाद झाला होता. तातोबा हांडे यांच्याकडे देवबाबा म्हणून पाहिले जाते. श्री रेणुका देवीचे ते निस्सीम भक्‍त असल्यामुळे शहरात त्यांना मानणारा प्रचंड वर्ग आहे. प्रभाग 3 मध्ये ओबीसी पुरुष आरक्षण पडल्यामुळे ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली होती. त्याप्रमाणे दोन अर्जही दाखल केले होते. छाननी 11 वाजता सुरू झाली. प्रभाग 2 मधील भाजपच्या सीमा पाटील आणि ताराराणीच्या रेवती पाटील यांनी परस्परांवर हरकती घेतल्या. मात्र, दोन्ही हरकती फेटाळत दोन्ही अर्ज वैध ठरवले. प्रभाग 3 मधील भाजपचे उमेदवार अण्णासाहेब शेंडुरे यांनी तातोबा हांडे यांच्या अर्जावर हरकत घेत जातीच्या दाखल्यावर व मतदार यादीत वेगळी नावे असल्याचे सांगितले. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्‍तिवाद केले. नंतर निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी तात्यासो हांडे यांचा जातीचा दाखला त्यांच्या नावावर आहे. मात्र, मतदान यादीत लक्ष्मी तातोबा हांडे असे नाव नमूद असल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविला. दरम्यान, या निर्णयाविरोधात हांडे न्यायालयात जाणार आहेत, असे सांगण्यात आले 

 ‘घड्याळ’ गायब

माजी सरपंच दीपाली शिंदे यांनी प्रभाग 9 मध्ये नगरसेवक पदासाठी अर्ज भरला होता तर राष्ट्रवादीमधून त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. तत्पूर्वी त्यांनी अपक्षही अर्ज भरला होता. त्यामुळे प्रथम अर्ज अपक्ष म्हणून आल्याने त्यांचा  राष्ट्रवादी  व इतर पक्षांच्या आघाडीकडून भरलेला अर्ज फेटाळण्यात आला. अपक्ष अर्ज मात्र वैध ठरला तर नगरसेवक म्हणूनही त्यांचा अर्ज वैध ठरला त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून घड्याळ गायब झाले.