Wed, Apr 24, 2019 12:04होमपेज › Kolhapur › निवडणूक कर्नाटकात, पैजा व चर्चा महाराष्ट्रात!

निवडणूक कर्नाटकात, पैजा व चर्चा महाराष्ट्रात!

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:31PMबानगे : वार्ताहर 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 12 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कर्नाटकात असली तरी  चर्चा व पैजा मात्र महाराष्ट्रात सुरू आहेत.

कर्नाटकातील शेवटचे टोक असणारा निपाणी विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्र शेजारी असून सीमा भागात येतो. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून वाळकीचे माजी आमदार काकासाहेब पाटील तर भाजपकडून विद्यमान आमदार सौ. शशिकला जोल्‍ले निवडणूक लढवीत आहेत. या दोन्ही उमेदवारांत चुरशीची लढत आहे.

निपाणी विधानसभा निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात म्हणजे त्यातही कागल तालुक्यात जोरदार आहे. कागल तालुक्यातील राजकारणातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी या दोन्ही उमेदवारांच्या महाराष्ट्रातील समर्थकांनी पैजाही लावल्या आहेत. सोनगे (ता. कागल) येथील हरिदास देसाई हे आ. जोल्‍ले समर्थक तर अजित पाटील काका पाटील समर्थक आहेत. यांनी आपलाच उमेदवार निवडून येणार, असा आत्मविश्‍वास बाळगून दहा हजार रुपयांची पैज लावली होती. मात्र, काही मध्यस्थांनी मध्यस्थी करून 10 हजारांची पैज हॉटेलमधील जेवणावर आणली. त्यामुळे या पैजेचे स्वरूप जरी आता छोटे वाटत असले तरी त्या लढतीबाबतची ओढ स्पष्ट होते.

राजकीय विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या कागल तालुक्यात सध्या गावच्या पारावर, बस स्टँडवर, शेतामध्ये कर्नाटकच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कर्नाटकच्या निवडणुकीवर दिल्लीच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याचीही चर्चा रंगते आहे.