होमपेज › Kolhapur › निवडणूक आयोगाच्या घरभेट मोहिमेस प्रारंभ

निवडणूक आयोगाच्या घरभेट मोहिमेस प्रारंभ

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 21 2018 10:09PMकागल : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या द‍ृष्टीने सध्या मतदार याद्या अधिकाधिक निर्दोष करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने सध्या घरभेट मोहिमेस सुरुवात केली आहे. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नोंदणीसाठी ईआरओ नेट प्रणालीचा वापर केला जाणार आहे. तसेच ओळखपत्रावर 16 ऐवजी 10 आकडी क्रमांक हा नवीन बदल करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2018 ला पात्र असूनही नोंद न झालेल्या आणि 1 जानेवारी 2019 पासून मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार्‍या व्यक्‍तींची नोंदणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. दुबार नोंदी व मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित व्यक्‍ती यांची माहिती घेत पूर्वीच्या नोंदीची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व नागरिकांनी आवश्यक माहिती बिनचूक देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या याद्यातील गंभीर त्रुटी स्त्री-पुरुष प्रमाण लोकसंख्या व मतदाराचे गुणोत्तर यातील विसंगती दूर करण्यासाठी विशेष काम करण्यात येणार आहे. सध्या बहुतांशी केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षक आहेत त्यांना सध्या सुट्टी आहे. त्यामुळे या कामाला उशीर होण्याची शक्यता सध्या व्यक्‍त केली जात आहे. सध्या काही अधिकारी गावोगावी जाऊन घरभेटी करीत आहेत. मात्र, नागरिकांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने या अधिकार्‍यांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे.