Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Kolhapur › व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागा बिनविरोध

व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागा बिनविरोध

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेसाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अधिसभेत आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. सात जागांवर विकास आघाडी तर एक जागेवर शिक्षक संघ (सुटा)चे उमेदवार निवडून आले.  तक्रार निवारण समितीसाठी मात्र विकास आघाडी आणि सुटामध्ये निवडणुक झाली. यामध्ये आघाडीचे डॉ. निखिल गायकवाड विजयी ठरले. विद्या परिषदेवर प्रताप माने (व्यवस्थापन प्रतिनिधी) यांची  बिनविरोध निवड झाली.

स्थायी समिती, तक्रार निवारण, विद्या परिषद, गुणवत्ता शिष्यवृत्ती समिती आदी सर्व विभागात आघाडीचे वर्चस्व राहिले. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी निर्धारीत वेळेत सदस्यांची भाषणबाजी रंगली. निवडीनंतर विजयी सदस्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सकाळी अकरा वाजता  निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली.  अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते.

विजयी उमेदवार असे...

शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे प्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. चंद्रशेखर कारंडे (प्राचार्य गट), डॉ.  निखिल गायकवाड (शिक्षक), धैर्यशील पाटील, राजूबाबा आवळे (व्यवस्थापन प्रतिनिधी) आणि संजय जाधव, लोभाजी भिसे (नोंदणीकृत पदवीधर) यांची व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली. यासह  शिक्षक संघाचे (सुटा) प्रकाश कुंभार यांची (शिक्षक) गटातून  बिनविरोध निवड झाली. विद्या परिषदेवर प्रताप माने (व्यवस्थापन प्रतिनिधी) यांची एकमताने निवड झाली.   विद्यापीठ संलग्‍न महाविद्यालये व मान्यताप्राप्‍त संस्था तपासणीसाठीच्या सदस्यत्वासाठी विकास आघाडीच्या किशोर जाधव, तर स्थायी समितीवर एल. जी. जाधव (प्राचार्य), मधुकर पाटील (नोंदणीकृत पदवीधर गट) यांची बिनविरोध निवड झाली.  

प्रा. जोगी यांची माघार, प्रा. पाटील विजयी

अध्यापक गटातील नामनिर्देशीत एका जागेसाठी सुटाच्या प्रा. ईला जोगी आणि विकास आघाडीचे  वसंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. यावेळी विकास आघाडीचे प्रताप माने, मोहन राजमाने यांनी वसंत पाटील यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले. यानंतर सुटाच्या सदस्यांनीही प्रा. जोगी यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. परंतु  प्रा. जोगी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने प्रा. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. 

36 विरुद्ध 8 मतांनी डॉ. गायकवाड विजयी 

तक्रार निवारण समितीवरील शिक्षक सदस्यत्वासाठी निवडणूक झाली. यात सुटाचे डॉ. नीळकंठ खंदारे आणि विकास आघाडीचे डॉ.  निखिल गायकवाड यांच्यात थेट  निवडणूक  झाली. आघाडीच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे सुटाकडून आवाहन करण्यात आले. दोन्ही बाजूकडून बिनविरोधासाठी भाषणे झाली. सहकार्याचे आवाहन करण्यात आले.  मात्र, दोन्हीकडूनही माघार झाली नसल्याने हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडली. अधिसभा सदस्यांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात  36 मतांसह निखिल गायकवाड यांनी बाजी मारली. नीळकंठ खंदारे यांना आठ मते मिळाली.  

गुणवत्ता शिष्यवृत्ती  समितीवर प्रा. घाटगे 

गुणवत्ता शिष्यवृत्ती निवड व छाननी समितीवर सदस्यत्वासाठी विकास आघाडीचे प्रा. सतीश घाटगे आणि सुटाचे ए. बी. पाटील  यांची उमेदवारी जाहीर झाली. यात पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.