Wed, Aug 21, 2019 03:01होमपेज › Kolhapur › आठ हजार शेतीपंप वीज कनेक्शन प्रलंबित

आठ हजार शेतीपंप वीज कनेक्शन प्रलंबित

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:34PMकोल्हापूर : सुनील सकटे 

राज्य शासनाने गेली तीन वर्षे निधीच उपलब्ध करून दिला नसल्याने शेतीपंपांना विजेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गेली दोन ते चार वर्षे शेतकरी विजेची तर महावितरण निधीची प्रतीक्षा करीत आहे. या दोघांची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात तब्बल आठ हजारांहून अधिक शेतीपंपांची कनेक्शन प्रलंबित आहेत. 

शेतीपंप कनेक्शनसाठी महावितरणला विद्युत खांब, सर्व्हिस वायर आणि इतर साहित्य, ट्रान्स्फॉर्मर यासाठी निधीची गरज असते.  मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित वीज बिल भरणार्‍या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांना शेतीपंपांसाठी कनेक्शन द्या म्हणून  विनवणी करावी लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिल वसुली चांगली असून, गळतीचे प्रमाणही कमी आहे. असे असताना येथील ग्राहकांना न्याय  मिळत नाही. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण सुमारे 24482  कृषिपंप कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी महावितरण कंपनीला तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. या निधीसाठी महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाकडून सरकारने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सरकारकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात 8381 शेतीपंपांची कनेक्शन प्रलंबित आहेत. यासाठी सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर सांगली 16  हजारांवर कनेक्शन प्रलंबित असून त्यासाठी 155 कोटी रुपयांची गरज आहे. हिवाळी अधिवेशनात कोल्हापुरातील आमदारांनी विधानसभेत आवाज उठविला आहे. मात्र, सरकारकडून फारसे सकारात्मक उत्तर मिळाल्याचे दिसत नाही. केवळ मे महिन्यापर्यंत प्रलंबित कनेक्शन देऊ, असे जुजबी उत्तर देण्यात आल्याने शेतकर्‍यांत प्रचंड नाराजी आहे. 

सांगली जिल्ह्यात इस्लामपूर विभागात 1741, कवठेमहाकांळ 6026, सांगली ग्रामीण विभागात 2956, सांगली शहर विभागात 26 आणि विटा विभागात 5352 कनेक्शन प्रलंबित आहेत. या सर्व ग्राहकांना पैसे भरून कनेक्शनसाठी वाट पाहावी लागत आहे. सरकारने मराठवाडा विदर्भातील तब्बल 900 कोटी रुपये वितरीत केले असून या निधीतून त्या भागातील शेतकर्‍यांची चालू वर्षातील कनेक्नश मिळण्याची सोय झाली आहे.