Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Kolhapur › आर्या गँगच्या आठ जणांना ‘मोक्‍का’

आर्या गँगच्या आठ जणांना ‘मोक्‍का’

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 1:14AMइचलकरंजी : प्रतिनिधी

कागलसह परिसरात दहशत माजवणार्‍या आर्या गँगवर विशेष मोक्‍का न्यायालय पुणे येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घराफोडीसारखे 22 गुन्हे दाखल आहेत. या टोळीचा म्होरक्या अमोल ऊर्फ आर्याभाई संभाजी मोहिते (वय 26, रा. सेनापती कापशी) याच्यासह सागर हिंदुराव नाईक (31, रा. कासारी), नेताजी ऊर्फ नेताभाई संभाजी मोहिते 
(23, रा. सेनापती कापशी), अवधूत संजय लुगडे (21, रा. माळवाडी-अर्जुनवाडा), प्रदीप ऊर्फ बिल्डर काकासो सातवेकर (23, रा. अर्जुनवाडा), प्रवीण बाबासो जाधव (28, रा. महादेव गल्ली, निपाणी), मिलिंद सुरेश सोकासणे (28, रा. महादेव गल्ली, निपाणी), आकाश संजय मोरे (23, रा. अक्‍कोळ रोड, निपाणी) यांचा समावेश असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली.

गोवा येथील दिलीप पुंडलिक धारगळकर यांचा मुलगा राहुल धारगळकर याच्यासह त्याचे मित्र मनोज मनोहर गावकर, सावळो प्रवीण गावकर, ज्ञानेश्‍वर गजेंद्र गोकाककर या चौघांचे होंडा कारसह (जीए-03 आर 8977) 9 डिसेंबर 2017 रोजी 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. 25 लाख न दिल्यास चौघांना जीवे मारण्याची धमकी देत अपहरणकर्त्यांनी त्यांना कागल गावच्या हद्दीत ठेवले होते. याबाबत कागल पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल झाली होती.

दरम्यानच्या काळात गारगोटीहून उत्तूरकडे जाणार्‍या रस्त्यावर मुलांसह गाडी सोडून देण्यात आली होती. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता हे चौघे शिर्डीचे दर्शन घेऊन गोव्याला परत येत असताना इंडिका कार व पुंटो कारने कागल येथून काहींनी पाठलाग करून तवंदी घाट ते आजरा जाणार्‍या रोडवरील बहिरेवाडी फाट्याजवळ चौघांना अडवण्यात आले. रिव्हॉल्व्हर, कोयता यांचा धाक दाखवून या चौघांचे अपहरण करून कासारी गावच्या हद्दीतील चिकोत्रा धरणग्रस्तांसाठी आरक्षित असलेल्या वसाहतीमधील समाज मंदिरात त्यांना डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून 13 हजार 500 रुपये रोख, एटीएममधून 40 हजार असा एकूण 53 हजार 500 रुपये व इतर साहित्य 1 लाख 6 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेतला होता. 

दरम्यान, राहुल धारगळकर याच्या वडिलांना अपहरणकर्त्यांनी फोन करून राहुलने अपघात करून 13 वर्षांच्या मुलास ठार मारले, असे खोटे भासवून त्यांच्याकडे 25 लाखांची खंडणी मागितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांना अमोल ऊर्फ आर्या गँगची कागलसह परिसरात दहशत असून त्यांच्यावर कागल, गडहिंग्लज, शिरोळ, बेळगाव आदी ठिकाणी खंडणी, अपहरण, दरोडा, खून, घरफोडी, चोरी, बलात्कार असे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या आठ जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या आठजणांच्या विरोधात ‘मोक्‍का’अंतर्गत कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक कोल्हापूर यांच्यामार्फत अप्पर पोलिस महासंचालक मुंबई यांना या टोळीविरोधात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यालाही मंजुरी मिळाली. त्यामुळे या आठ जणांच्या विरोधात विशेष मोक्‍का न्यायालय पुणे येथे दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली. आणखीन काही टोळ्या मोक्‍कांतर्गत कारवाईसाठी रडारवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.