Wed, Mar 20, 2019 09:07होमपेज › Kolhapur › ‘स्थायी’साठी नगरसेवकांत चुरस

‘स्थायी’साठी नगरसेवकांत चुरस

Published On: Jan 06 2018 1:22AM | Last Updated: Jan 06 2018 12:35AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापालिकेची अर्थवाहिनी समजल्या जाणार्‍या स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर जाण्यासाठी त्या त्या पक्षांतील नगरसेवकांत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. त्याबरोबरच परिवहन, महिला व बालकल्याण समिती सदस्यांच्या निवडीही करण्यात येणार आहेत. 19 जानेवारीला होणार्‍या महासभेत सर्वांच्या निवडीवर शिक्‍कामोर्तब होईल. 

स्थायी समितीतून काँग्रेसच्या निलोफर आजरेकर, रिना कांबळे, जयश्री चव्हाण व दिलीप पोवार यांच्यासह भाजपचे उमा इंगळे, मनीषा कुंभार, ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम, शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले निवृत्त होत आहेत. परिवहन समितीतून काँग्रेसचे लाला भोसले, उमा बनछोडे, प्रवीण केसरकर, भाजपचे विजय खाडे, ताराराणी आघाडीचे सुहास देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत सूर्यवंशी निवत्त होणार आहेत. निवृत्त होणार्‍या नगरसेवकांच्या जागेवर त्या त्या पक्षांतील नगरसेवकांची सदस्यपदी निवड केली जाणार आहे. नगरसेवकांची पहिली पसंती महापालिकेचे अर्थकारण असलेल्या स्थायी समितीला आहे. त्यानंतर काहीच नसले तरी परिवहन समितीत सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी प्रयत्न सुरू होणार आहेत. 

घरबसल्या स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारी नोंदवा : आयुक्‍त

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सर्व नागरिकांना स्वच्छता व कचरा उठावासंबंधीच्या तक्रारींसाठी शासनाकडून अ‍ॅप डेव्हलप करण्यात आले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आतापर्यंत 11 हजारांवर नागरिकांच्या मोबाईलवर अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यावरून नागरिकांनी तक्रारी कराव्यात.

तसेच केंद्रीय समितीकडून शहरातील कचर्‍याविषयी मोबाईलवर प्रश्‍न विचारणा झाल्यास शहर स्वच्छतेबाबत योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी केले.  दरम्यान, राज्य शासनाने स्वच्छ प्रभाग स्पर्धा आयोजित केली असून त्याची कोल्हापूर शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. यातील विजेत्या प्रभागांना अनुक्रमे 30, 20 व 15 लाखांची बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही शासनाने कळविले असल्याची माहिती आयुक्‍तांनी दिली.

शालिनी सिनेटोनच्या जागेसाठी प्रयत्न : आयुक्‍त

कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटानची जागा त्याच सिनेटोनसाठी महापालिकेच्या ताब्यात राहावी यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्य शासनाकडे त्यासंदर्भात सुनावणी सुरू असून त्याचीही माहिती घेतली जाईल. त्यामुळे कायदेशीर सर्व बाबी तपासूनच शालिनी सिनेटोनचा निर्णय घेऊ, अशी माहिती आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. बहुतांश नगरसेवकांनी फेरप्रस्तावाची मागणी केली असली, तरी 19 जानेवारीला होणार्‍या महासभेपूर्वी त्यासंदर्भातील निर्णय घेऊ, असेही आयुक्‍तांनी सांगितले.