Fri, Mar 22, 2019 01:40
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या : आ. क्षीरसागर

आठ दिवसांत नुकसानभरपाई द्या : आ. क्षीरसागर

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:30AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी  

भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर कोल्हापूर बंदच्या पार्श्‍वभूमीवर  काही समाजकंटकांनी शहरात दगडफेक करून मोठ्या प्रमाणात  वाहने व दुकानांचे नुकसान केले. या नुकसानीचे पंचनामे करून आठ दिवसांत संबंधीतांना भरपाई मिळावी, अशी मागणी आ. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. आमचा प्रतिमोर्चा बंद काळात दगडफेक करणार्‍या समाजकंटकांविरोधात होता, असेही त्यांनी सांगितले.  

आ. क्षीरसागर म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेचे समर्थन कोेणीही करत नाही. त्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा म्हणून व्यापारीवर्गाने  सर्व व्यवहार बंद ठेवले होते; पण बंद  दुकानांवर समाजकंटकांनी दगडफेक केली. यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्‍त होऊ लागली. अशा स्थितीत शहरवासीयांचे रक्षण करण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो. हा प्रतिमोर्चा कोणत्याही समाज घटकांविरोधात नव्हता. सीपीआर चौकातील जमावाला मागे जाण्याचे आवाहन केले. काही जखमींना स्वत: सीपीआरमध्ये दाखल केले.

प्रतिमोर्चात कोणत्याही पक्ष किंवा संघटनेचे लोक नव्हते, तर समाजकंटकांना रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणात पोलिस प्रशासनाने योग्य ती भूमिका वठविली नसल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी केला. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सर्व समाज बांधवांनी सलोख्याने राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे शासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.  यावेळी रवी इंगवले, किशोर घाडगे, जयवंत हारुगले, सुनील जाधव, महेश उत्तुरे आदी उपस्थित होते.