Thu, Jun 20, 2019 14:56होमपेज › Kolhapur › नदी शुद्धीकरण प्रकल्पात पंचगंगेच्या समावेशासाठी प्रयत्न

नदी शुद्धीकरण प्रकल्पात पंचगंगेच्या समावेशासाठी प्रयत्न

Published On: Jun 21 2018 1:37AM | Last Updated: Jun 21 2018 1:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

देशातील नद्यांच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचगंगा नदीचा समावेश व्हावा, याकरिता आपले प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पंचगंगेच्या काठावरील गावांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पांचे वर्षभरात क्‍लस्टर उभारले जातील, तसेच या गावांना शुद्ध पाणी देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी पंचगंगा परिक्रमा हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार नदीकाठावरील गावांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जाणार आहेत. चार ते आठ गावांचा एक, असे हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे क्‍लस्टर तयार करण्यात येतील. त्यासाठी येणारा खर्च जिल्हा नियोजन समिती, तसेच सीएसआर निधीतून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरोळ तालुक्यात शुद्ध पाण्याचा प्रश्‍न आहे. रासायनिक खतांचे प्रमाण वाढल्याने हा परिणाम दिसू लागला आहे. यामुळे या तालुक्यातील गावांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न राहील, यासह पंचगंगा नदीकाठावरील गावांतही शुद्ध पाण्यासाठी ‘आर.वो.’ आणि ‘वॉटर एटीएम’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणात सर्वाधिक वाटा असलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राज्य शासनाने भरघोस निधी दिला आहे. त्यानुसार काम सुरू आहे, त्यावर नियंत्रणही ठेवले जात आहे. लवकरच हा प्रश्‍नही मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले. पंचगंगेचे प्रदूषण करणार्‍या औद्योगिक घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई सुरू असते, असेही त्यांनी सांगितले.रंकाळा तसेच नदीतील वाढत्या जलपर्णी काढण्याकरिता एक यांत्रिकी बोट घेण्याचा निर्णय झाल्याचे सांगत पाटील म्हणाले, ही बोट जिल्ह्यात जलपर्णी काढण्यासाठी वापरली जाईल. पंचगंगा नदीचा नद्या शुद्धीकरण प्रकल्पात समावेश करावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाणंद रस्ते मोकळे करणार

राज्यातील पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे सांगत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून याबाबतचा आराखडा तयार केला जाईल. त्यासाठी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा, हे निश्‍चित करून लवकरच या कामाला प्रारंभ केला जाईल. यामुळे शेतकर्‍यांची अनेक अडचणींतून सुटका होणार आहे. यासह कृषिमंत्री म्हणून पीक विमा योजनेतील अडचणी दूर करण्याबाबत नुकतीच बैठक घेतल्याचे सांगत मंत्रिमंडळ विस्तारात कृषिमंत्री म्हणून अन्य कोणाला तरी जबाबदारी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येकाने तसे म्हणायचेच असते! पालकमंत्र्यांचा उद्धव यांना टोला

मुख्यमंत्री आमचाच करणार, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानाची खिल्ली उडवताना पालकमंत्री म्हणाले, प्रत्येकाने तसे म्हणायचेच असते. यापूर्वीही ते म्हणाले होते, पण मुख्यमंत्री भाजपचा झाला. यापुढे खरे तर दोघांनी एकत्र मिळून मुख्यमंत्री ठरवला पाहिजे. नाहीतर याचा काँग्रेसला फायदा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन होत असल्याबाबत विचारता, कोणाला काहीही करण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यावर अधिक बोलण्याचे पालकमंत्र्यांनी टाळले.