Thu, Nov 15, 2018 03:26होमपेज › Kolhapur › ना. तावडे गुरुजींनी घेतला ‘नापास’ विद्यार्थ्यांचा तास

ना. तावडे गुरुजींनी घेतला ‘नापास’ विद्यार्थ्यांचा तास

Published On: Jun 10 2018 1:02PM | Last Updated: Jun 10 2018 1:02PMकोल्हापूर : प्रतिनिधी

नापास होणे ही सुद्धा मित्रांनो एक संधी आहे. अजिबात धीर सोडायचा नाही, पुन्हा परीक्षा द्या. सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमातून आवडता कोर्स शिका. राज्य सरकार तुमच्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याने काळजी करू नका. असा गुरू सल्ला दस्तरखुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिला. सर्किट हाऊसच्या परिसरात दहा नापास झालेल्या विद्यार्थ्यांशी मंत्री तावडे यांनी आपुलकीने संवाद साधून त्यांचा आत्मविश्‍वास वाढवला.

मंत्री तावडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची व्यक्‍तिगत विचारपूस केली.  कोणता विषय अवघड वाटतो, असा त्यांनी प्रश्‍न विचारल्यावर काहींनी गणित आणि काहींनी इंग्रजी असे सांगितले. ज्यांना हे विषय अवघड वाटतात अशांसाठी पर्याय देता येतील का, याचा विचार केला जात असल्याचे सांगितले. पास आणि नापास या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येतच राहतात. त्यामुळे या गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्‍वास कमी होता कामा नये. आपण पुन्हा परीक्षा द्या. तुम्हाला ज्यात आवड आहे, असा कोर्स कौशल्य विकास योजनेतून करा. या कोर्सनंतर तुम्हाला नोकरी मिळेल. त्यामुळे कसलीही चिंता करण्याची गरज नाही. मंत्री महोदय स्वत:च विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून संवाद साधत असल्याने सबंधित विद्यार्थ्यांचे चेहरेही खुलले होते.  यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.