Thu, Jun 27, 2019 11:49होमपेज › Kolhapur › शिक्षण बचाव : २३ मार्चला कोल्हापुरात लाखोंचा मोर्चा

शिक्षण बचाव : २३ मार्चला कोल्हापुरात लाखोंचा मोर्चा

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षण वाचविण्यासंदर्भातील लढा हा सामान्य माणसाच्या पाठिंब्यावर शांतता व सनदशीर मार्गाने लढणार आहे. बहिर्‍या सरकारची झोप उडविण्यासाठी कोल्हापुरात दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गांधी मैदान येथून जिल्हा कार्यालयावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांचा लाखोंचा मोर्चा काढला जाणार आहे. सरकारला आमचे ऐकावेच लागेल, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ विचारवंत, नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी दिला.

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 26) बैठक झाली. यावेळी त्यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, गरिबांच्या शाळा बंद झाल्यानंतर मोठा आघात मुलींच्या शिक्षणावर होणार आहे. शाहू-फुले- आंबेडकर यांनी उभारलेला शिक्षणाचा वारसा जपण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या धोरणाविरोधात उभे राहून वठणीवर आणले नाही, तर पुढील पिढीस काय सांगणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सरकार चर्चेला बोलावून मार्ग काढेल, या भ्रमात नसल्याचे सांगत प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखविल्यास आमची तयारी आहे. आंदोलन करण्याची कोणतीच हौस नाही. पैशांचे सोंग आणता येत नाही म्हणूनच सरकारने शाळा बंद करण्याचा उपद्व्याप सुरू केला आहे. राज्यघटनेने केंद्र व राज्य सरकारांच्या सूचीमध्ये शिक्षणासंदर्भात काही बंधने घातलेली आहेत. कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय खपवून घेतला जाणार नाही.

टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांनी शाळा काढल्यास ते ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर चालविण्यास बंधनकारक नाहीत. शिक्षणाचा प्रश्‍न हा देशातील सामान्य माणसाचा आहे, यात श्रीमंतांचा बळी जाणार नाही. गरिबांचे शिक्षण बंद करून सरकारने त्यांच्या अन्‍नात मीठ कालवण्याचे काम करू नये, अशी सरकारला हाक देणार आहे. नाही ऐकले, तर सरकारला आमचे म्हणणे ऐकण्यास भाग पाडू, असा इशाराही प्रा. एन. डी. पाटील यांनी यावेळी दिला. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष डी. बी. पाटील, एस. डी. लाड, भरत रसाळे, दादा लाड, व्यंकाप्पा भोसले, 

प्राचार्य टी. एस. पाटील, प्रभाकर आरडे, कॉ. रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, सुवर्णा तळेकर, वसंतराव मुळीक, अशोक पोवार, रमेश मोरे, गिरीश फोंडे उपस्थित होते.

दै. ‘पुढारी’चे कौतुक

दै. ‘पुढारी’मध्ये सोमवारपासून (दि. 26) शासनाच्या प्राथमिक शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात ‘खासगीकरणाची शाळा’ ही वृत्तमालिका सुरू करण्यात आली आहे. गरिबांचे शिक्षण बंद पाडण्याच्या प्रश्‍नास वाचा फोडल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून दै. ‘पुढारी’चे कौतुक केले जात आहे. वृत्तमालिकेची कात्रणे सर्व शाळांमध्ये दर्शनी भागावर लावण्यात येणार आहेत, असे शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी सांगितले.

गरिबांच्या शाळा बंद करून खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे हा उंट तंबूत शिरून सर्व फाडून सगळ्यांना बाहेर काढेल, अशी भीती प्रा. एन. डी. पाटील यांनी व्यक्‍त केली.