Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Kolhapur › शिक्षण मंडळ शाळांचे अस्तित्व धोक्यात

शिक्षण मंडळ शाळांचे अस्तित्व धोक्यात

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 12:20AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी नगरपालिकेच्या शाळांना आवश्यक त्या भौतिक सुविधा पुरवण्यात येत नसल्यामुळे पटसंख्येची गळती कायम आहे. विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने रोडावत असल्यामुळे भविष्यात विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, शाळांच्या समायोजनाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. 

समायोजनाच्या विषयावरून लवकरच पालिकेची विशेष सभा बोलवून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. इचलकरंजी नगरपालिकेच्या 17 इमारतींमध्ये 46 शाळा भरवल्या जातात. इचलकरंजी शहराची लोकसंख्या आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करता सुरुवातीच्या काळात या शाळांना सोन्याचे दिवस होते. कालांतराने इचलकरंजीचा विस्तार झपाट्याने वाढत गेला. आर्थिक सुबत्ताही मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शहरात खासगी शाळांचे पेव फुटले. या शाळांकडून सर्व सुविधा पुरवण्यात येत असल्यामुळे पालकांचा कल अशा शाळांकडे वाढला. त्यामुळे दिवसेंदिवस नगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावू लागली आहे. काही शाळांमधील पटसंख्या तर चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

पालिकेच्या बहुतांशी इमारतींमध्ये एका शाळेत चार शाळा भरवल्या जातात. पालिकेच्या शाळांमधून पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांची काही शाळांतील पटसंख्या तर अत्यल्प असल्याचे समोर येत आहे. पटसंख्येचा विचार करता शाळांच्या समायोजनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात शाळांचे समायोजन करण्याची शक्यताही त्यामुळे निर्माण झाली आहे. पालिकेकडून भौतिक सुविधा पुरवण्यात आल्या, तरी गुणवत्ता टिकवण्याची जबाबदारी शिक्षकांवर येणार आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी मिळवण्यासाठी आणि पटसंख्या टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.