Tue, Apr 23, 2019 02:06होमपेज › Kolhapur › अंधश्रद्धेतून ‘मांडूळ’ला तस्करीचे ग्रहण

अंधश्रद्धेतून ‘मांडूळ’ला तस्करीचे ग्रहण

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 13 2017 11:53PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी 

प्रचंड अंधश्रद्धेमुळे मांडूळ या सर्प जातीवरील संकट वाढत चालले आहे. गुप्‍तधन आणि काळी जादू करण्यासाठी या सर्पाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. गावभाग पोलिसांनी मे महिन्यात कारवाई करून मांडूळ तस्कर जोतिबा खटावे, सागर डक्कू, भानुदास गंगधर व सागर कांबळे या चौघांना अटक केली होती तर नुकतेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अन्वर बशीर मुकादम याला मांडूळ सर्पासह वन विभागाच्या ताब्यात दिले. त्यामुळे मांडुळाची तस्करी अद्यापही सुरू असल्याचे उघड झाले आहे. 

साप म्हटले की सर्वसामान्यांची बोबडी वळते. मात्र, गुप्‍तधन आणि काळी जादू करण्यासाठी शेतकर्‍याचा मित्र म्हणून ओळख असलेल्या ‘मांडूळ’ या सर्पाचा नाहक बळी दिला जात आहे. एक मांडूळ सर्पासाठी तब्बल 25 लाख रुपये मिळतात, या गैरसमजुतीतून अनेकजण मांडूळ तस्करीत गुंतले आहेत. यापूर्वी सर्प विष तस्करीमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी जैनाळ येथील एका युवकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी इचलकरंजीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारालाही विष तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली होती. यावेळी इचलकरंजीतील आणखीन काही तरुण या कारवाईपासून बचावले होते. त्यामुळे मांडूळ आणि विषतस्करी इचलकरंजीसाठी नवीन नाही. 

अकिवाट येथील चौघा संशयितांना महासत्ता चौकातून गावभाग पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मांडूळ सर्प हस्तगत करण्यात आला होता. कॅन्सर उपचारासाठी मांडूळ सर्पाचे विष गुणकारी असल्याच्या गैरसमजुतीतून त्यांनी सर्प तस्करी करीत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर काही दिवस सर्प तस्करीचा गुन्हा दाखल नव्हता. मात्र, आठवड्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी बस स्थानकातून अन्वर मुकादम याला मांडूळसह ताब्यात घेतल्यामुळे मांडूळ तस्करी अद्याप सुरूच असल्याचे उघड झाले आहे. 

इचलकरंजीपासून कर्नाटक राज्य जवळ आहे. शिवाय कामानिमित्त निसर्ग संपन्‍न अशा आजरा, चंदगड तालुक्यातील नागरिकांचीही इचलकरंजीशी नियमित संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सर्प तस्करी केली जात असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. परिणामी, अशा तस्करी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर मांडुळाचा रंग काळा, चॉकलेटी व लालसर असतो. उंदीर, कीटक, पाली, सरडे हे त्याचे अन्‍न आहे.

अन्‍न न मिळाल्यास मातीतील पोषक घटकांवर तो जगतो. मांडूळ घरात ठेवला तर धनलाभ होतो, पैसा मिळतो, मांडूळ गुप्तधनाचा शोध घेण्यास मदत करतो अशा विविध अंधश्रद्धा पसरल्या आहेत. त्यामुळे गुप्तधन शोधून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, लैंगिक क्षमता वाढविणे यासारख्या अंधश्रद्धेतून या सापाचा मोठ्या प्रमाणात बळी दिला जात असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. परिणामी, त्यांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे.