होमपेज › Kolhapur › ई शक्ती अ‍ॅपने जोडले 4 हजार बचत गट 

ई शक्ती अ‍ॅपने जोडले 4 हजार बचत गट 

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 10:55PMकोल्हापूर : डी.बी.चव्हाण

ग्रामीण भागात महिलांसाठी वरदान ठरत असलेली चळवळ म्हणजे बचत गटाची चळवळ होय. ही चळवळ अधिक सक्षम आणि पादर्शीपणे चालावी, यासाठी नाबार्डने ई शक्ती अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपव्दारे जिल्ह्यातील 4 हजारांवर बचत गट नाबार्डशी जोडण्यात आले असून येत्या दोन ते तीन महिन्यांत 10 हजार बचत गट जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यातून ही चळवळ सक्षम होईलच याशिवाय महिलांच्या हाताला काम मिळून महिला सबलीकरणाचा शासनाचा प्रयत्न साध्य होईल, असा विश्‍वास नाबार्डकडून  व्यक्त केला जात आहे. 

नाबार्डच्या माध्यमातून बचत गटांना 2 ते 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. मात्र या कर्जाचा हिशेब ठेवण्यास बचत गटातील महिला कमी पडतात. यातून काही घोटाळ्याचे प्रकारही घडू शकतात. हा प्रकार बचत गट चळवळीला मारक ठरण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी नाबार्डने ई शक्ती अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपची अंमलबजावणी करण्यासाठी नाबार्डने देशातील 75 जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. 

जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी ही योजना सुरू झाली आहे. या योजनेचा प्रचार, प्रसार आणि बचत गटाची माहिती मोबाईलवर ई शक्ती अ‍ॅपमध्ये भरुन घेण्यासाठी नाबार्डने जिल्ह्यातील 7 संस्थांची निवड केली आहे. यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, सृष्टी संस्था आदी संस्थांचा समावेश आहे. प्रत्येक संस्थांनी 10 ते 12 कार्यकर्ते निवडले असून हे कार्यकर्ते आपापल्या भागात जाऊन बचत गटांची दर महिन्याची आर्थिक उलाढाल, येणे देणे, कर्ज वितरण यांची माहिती अ‍ॅपवर नोंदवत आहेत. गेल्या चार महिन्यात 4 हजार बचत गटांची नोंद या अ‍ॅपवर झाली आहे. यातून नाबार्डला जिल्ह्यातील बचत गटांची आर्थिक उलाढाल निदर्शनास येऊ लागली आहे. या अ‍ॅपला महिला बचत गटातील सदस्यांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. हिशेब ठेवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट काम कमी होत असल्यामुळे काही महिला बचत गट स्वत:हून अ‍ॅपशी जोडले जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.