Wed, Apr 24, 2019 19:33होमपेज › Kolhapur › रोजगाराच्या नव्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कल!

रोजगाराच्या नव्या संधीमुळे वाणिज्य शाखेकडे कल!

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 1:31AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

जीएसटी, बँकिंग क्षेत्रात झालेले बदल, ऑनलाईन बँकिंग व्यवहारात वाढ, कमी खर्चात शिक्षण होत असल्याने विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे वाढला आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.  गेल्या काही वर्षांत खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर प्रवेश जागा वाढल्याने स्पर्धा होऊन हजारो प्रवेश जागा रिक्‍त राहत आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत  असल्याचे चित्र पहावयास मिळते. तर बी.कॉम., बीबीएपासून ते सी.ए.पर्यंतच्या शिक्षणासाठीचा येणारा खर्च हा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत कमी आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळेल याची शाश्‍वती नसल्यानेे विद्यार्थी वाणिज्य शाखेस प्रवेश घेत आहेत. यातही वाणिज्य इंग्रजी शाखेस पसंती वाढली आहे.  

अलीकडील काळात बँकिंग क्षेत्रात नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. शासनाने ऑनलाईन बँकिंगच्या वापरास प्रोत्साहन दिल्याने आर्थिक साक्षरता वाढली आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) ‘वन नेशन, वन टॅक्स’ प्रणाली लागू केल्याने देशात कोठेही वाणिज्य शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार मिळविणे शक्य झाले आहे. 2020 पर्यंत जगात इंटरनॅशनल फायनान्स रिपोर्टिंग सिस्टीम (आयएफआरएस) लागू होणार आहे. यामुळेही वाणिज्य क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.