Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Kolhapur › गाय दूध खरेदी बंद झाल्यास उत्पादकांवर संकट

गाय दूध खरेदी बंद झाल्यास उत्पादकांवर संकट

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:32PMनूल : अविनाश कुलकर्णी

स्वाभिमानी दूध संघासह गोकुळ दूध संघानेही गाईचे दूध संघाला तोट्यात नेत असल्याने खरेदी दरात कपात केली आहे. भविष्यात गाय दूध खरेदी बंदच करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खेडोपाड्यातील गोरगरीब शेतकर्‍यांचे संसार उद्ध्वस्त होतील अशी भीती व्यक्‍त होत आहे.एकीकडे गोमाता म्हणून ज्या प्राण्याची आपण पूजा करतो. गाईच्या दुधापासून बनवले जाणारे सर्वच पदार्थ आणि गोमूत्र यांना आयुर्वेदात विशेष महत्त्व असताना दूध संघांनी मात्र परवडत नसल्याने गाईच्या दुधाकडे पाठ फिरवणे कितपत योग्य आहे. 

नूल परिसरातील अनेक गावांत आधुनिक पद्धतीने गोठा प्रकल्प साकारले आहेत. काही गोठ्यांतून दररोज तीनशे ते चारशे लिटर दूध पुरवठा गोकुळसह इतर दूध संघांना होत असतो. नूल, मुगळी, जरळी, दुंडगे, हेब्बाळ, निलजी, मुत्नाळ, हिटणी, माद्याळ, हसुरचंपू,  भडगाव, खणदाळ, नांगनूर आदी सर्वच गावांतून कमी जास्त प्रमाणात गाईच्या दुधाचा पुरवठा होत असतो. मुळात शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. दहा दिवसांच्या दूध बिलावर अनेक कुटुंबांची गुजराण सुरू आहे. भूमिहीन शेतमजूर सुद्धा एक गाय पाळून कसे बसे दोन वेळचे पोट भरत आहेत. अशी अनेक कुटुंबे उद्ध्वस्थ होण्याची भीती जाणकारांतून व्यक्‍त होत आहे.

गोकुळने संकलित केलेले गाईचे दूध आणि त्यापासून बनवलेल्या इतर उत्पादनांची विक्री होत नसल्याने दूध दर कपातीचा निर्णय गोकुळने घेतला असला तरी या निर्णयामुळे दूध उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. गोकुळच्या या निर्णयाने खेडोपाड्यातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत.नूल परिसरातील दहा ते बारा गावांतून दररोज सुमारे सात ते आठ हजार लिटर गाईच्या दुधाचे संकलन होत असते. या सर्वच दूध उत्पादकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. स्वाभिमानीने यापूर्वीच गाय दूध खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या शेतकर्‍यांना वाली कोण? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. खेडोपाड्यात गाईचे दूध घरात वापरणार्‍यांची संख्या खूपच कमी आहे. काही उत्पादक गाईचे दूध डेअरीत घालून घरी वापरण्यासाठी म्हैस दूध खरेदी करतात, असेही चित्र पाहायला मिळते. एकंदर धार्मिक महत्त्व लाभलेल्या गाईच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गाईंचे संगोपन कसे करायचे?

शासनाने बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आणल्याने जातिवंत बैलांची पैदास बंद झाली आहे. एकिकडे गीर जातीच्या गाईच्या दुधातील औषधी मुल्यामुळे लाख दीडलाख रुपये मोजून खरेदी केलेल्या गाईचे करायचे काय? हा प्रश्‍नही अनुत्तरीत आहे. गोमातेचे रक्षण व्हावे म्हणून काही संघटना काम करीत असताना त्या गाईंचे संगोपन कसे करायचे हा नवा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आवासून उभा आहे.