Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Kolhapur › खाते बदलामुळे ११ कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

खाते बदलामुळे ११ कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:05PMगडहिंग्लज ः प्रवीण आजगेकर

राज्य शासनाने एखादे खाते बंद करून त्याऐवजी अन्य खाते करण्याचा निर्णय घेतल्याचे दूरगामी परिणाम त्या खात्यातील कर्मचार्‍यांवर दिसून येतात. अशातच जर या कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यास त्यांना न्याय मिळताना फारच अडचणी येतात याचे चित्रच गडहिंग्लजला पाहावयास मिळत आहे. गडहिंग्लज येथील लघुजलसिंचन कार्यालयाकडील तब्बल 11 कर्मचार्‍यांचा गेल्या चार महिन्यांपासून पगारच झाला नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कमी संख्या असल्याने त्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष कोण देणार अशीच स्थिती झाली असून जिल्ह्यात केवळ गडहिंग्लजलाच हे कार्यालय असून याच लोकांवर ही समस्या आली आहे. 

राज्य शासनाने लघुजलसिंचन विभाग, कृषी विभाग व मृदू संधारण विभाग यातील कर्मचार्‍यांचे एकत्रिकरण करून नवा विभाग करण्याबाबत जीआर 31 मे 2017 रोजी काढला असून नेमका याचाच तोटा गडहिंग्लजमधील कर्मचार्‍यांना झाला आहे.

याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय 1 एप्रिल 2018 रोजी झाला असून त्यादिवसापासून या कर्मचार्‍यांचे त्या खात्यामधील पगार बंद करण्यात आले आहेत. त्यांना नव्या खात्याकडे वर्ग करून त्यांचे पगार अदा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मुळातच कोल्हापूर सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये लघुजलसिंचनची कार्यालये बहुतांशी तालुक्यामध्ये असल्याने त्यांना वरिष्ठ अभियंता असल्याने त्यांच्या स्तरावर शासकीय कागदपत्रांची आवश्यक ती पूर्तता करून तात्पुरता पगार अदा करण्याबाबतचे नियोजन झाले आहे.

याउलट स्थिती कोल्हापूर जिल्ह्याची झाली असून या विभागाचे केवळ गडहिंग्लजला एकमेव कार्यालय असून त्यांना वरिष्ठ अधिकारी नसल्याने यांच्या पगाराची समस्या आजअखेर ‘जैसे थे’ राहिली आहे. मार्च 2018 पासून या कर्मचार्‍यांचे केवळ याच कारणामुळे पगार झाले नसून यामुळे या कर्मचार्‍यांना दैनंदिन गरजा कशा भागवायच्या? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बँकांचे हप्ते, विम्याचे हप्ते हे प्रलंबितच राहत असून घरखर्चासाठीही उसणवारी करावी लागत आहे. एखादा महिना पगार नाही मिळाला असता तरी अडचण नव्हती. मात्र, तब्बल चार महिने पगारच नसल्याने हे कर्मचारी आता आंदोलनाच्या मानसिकतेमध्ये आहेत.

गडहिंग्लजच्या लघुजलसिंचन कार्यालयाकडे शाखा अभियंता एक, 5 कनिष्ठ अभियंता, 3 क्‍लार्क, 3 शिपाई अशी पदे आहेत. या सर्वांचा मिळून 5 लाख 19 हजार 131 रुपये पगार होत असून फेबु्रवारी 2018 रोजी त्यांना शेवटचा पगार दिला होता. त्यानंतर केवळ खात्याच्या बदलाचा गोंधळच सुरू असून अजून किती महिने हा गोंधळ चालणार आहे याबाबत अद्यापही निश्‍चितपणे सांगता येत नसल्याने या कर्मचार्‍यांना पगारासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार आहे, हे अनिश्‍चितच आहे.