Wed, Jan 16, 2019 16:26होमपेज › Kolhapur › खराब हवामानामुळे विमान आलेच नाही!

खराब हवामानामुळे विमान आलेच नाही!

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 12:12AMउजळाईवाडी : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई खंडित झालेली विमान सेवा मंगळवार (दि. 10 जुलै) पासून सुरू होणार होती, पण मुंबई येथे जोरदार झालेल्या पावसामुळे हवामान खराब असल्याने मुंबई येथून विमानाने टेकऑप घेतले नाही. दरम्यान, आज बुधवारचे विमान येण्याची शक्यता एअर डेक्‍कनच्या प्रशासनाकडून वर्तवण्यात आले आहे.

24 जूनपासून कोणतेही ठोस कारण न देता एअर डेक्‍कन कंपनीने कोल्हापूर-मुंबई सेवा बंद केली होती. खा. धनंजय महाडिक यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे एअर डेक्‍कन कंपनीने चुकीच्या पद्धतीने विमानसेवा बंद केल्याबद्दल नाराजी व्यक्‍त करत दुसर्‍या कंपनीस कोल्हापूर-मुंबई विमान सेवा चालवण्यास देण्यात यावी, अन्यथा कंपनीने पुन्हा सेवा चालू करावी, अशी मागणी केली होती. या आग्रही भूमिकेमुळे एअर डेक्‍कनने पुन्हा विमान सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली होती.या अनुषंगाने कोल्हापूर विमानतळावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ए.टी.सी. द्वारे वॉच ठेवण्यात आला होता, पण मुंबईहून येणारे हे विमान खराब हवामानामुळे टेक ऑप झाले नाही. त्यामुळे मंगळवारचे विमान रद्द झाले; परंतु आज हे विमान येण्याची शक्यता विमान कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आले.