Fri, Jul 19, 2019 18:24होमपेज › Kolhapur › ‘जलयुक्‍त शिवार’मुळे १७९ गावे झाली ‘पाणीदार’

‘जलयुक्‍त शिवार’मुळे १७९ गावे झाली ‘पाणीदार’

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:04AMम्हाकवे ः डी. एच. पाटील

जलयुक्‍त शिवार अभियानामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 179 गावे बहरली असून, भविष्यातील पिकांसाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही मार्गी लागणार आहे. त्यामुळे जलयुक्‍त शिवार योजना या 179 गावासाठी संजीवनी ठरणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत गेल्या चार वर्षांत 179 गावांमध्ये 48 कोटी 76 लाख रुपये खर्चाची 1 हजार 835 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याअंतर्गत 7 हजार 18 टीसीएम पाणी साठा झालेला आहे. 

अभियानाच्या पहिल्या वर्षी जिल्ह्यातील 69 गावांमध्ये 30 कोटी 38 लाख रुपये खर्चून 1 हजार 212 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.  दुसर्‍या वर्षी जिल्ह्यातील 20 गावांमध्ये 461 कामांकरिता 22 कोटी 2 लाख रुपयांचा आराखडा तयार केला असून, 461 कामे पूर्ण केली आहेत. 17 कोटी 7 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तृतीय वर्षी जिल्ह्यातील 18 गावांतून 215 कामे प्रस्तावित होती. यापैकी 162 कामे प्रगतिपथावर आहेत, तर 1 कोटी 31 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. चौथ्या वर्षी 72 गावांची निवड करण्यात आली असून, गावपातळीवर गाव आराखडे तयार करण्यात येत आहेत. गेल्या चार वर्षांत ही योजना यशस्वी झाल्यामुळे 7018 टीसीएम पाणी साठा उपलब्ध झाला आहे. 

जलयुक्‍त शिवार योजनेअंतर्गत कृषी, लघुसिंचन, जलसंधारण, जलसंपदा, ग्रामीण पाणीपुरवठा, सामाजिक वनीकरण, वनविभाग, भूजल सर्वेक्षण व विकास संत्रणा अशी विविध कामे करण्यात आली आहेत.  179 गावांमध्ये पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतीकरिता  मार्ग सुकर झाला आहे. अनेक गावांत पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे घेतली असून, बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, माती बांध, तसेच सिमेंट बंधारे आदी जलस्त्रोतांची साठवण क्षमता शासन योजना लोकसहभागातून वाढविण्यात आल्यामुळे आज या गावातून शाश्‍वत जलसाठे दिसू लागले आहेत. या शाश्‍वत जलसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहेच. शिवाय, शेतीसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. जलयुक्‍त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे बहरणार आहेत. दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या अभियानाचा निश्‍चितच उपयोग होणार आहे.