कोल्हापूर : प्रतिनिधी
‘डीएसके’ ग्रुपचे सर्वेसर्वा डीएसके तथा दीपक कुलकर्णी, पत्नी हेमंती दाम्पत्याना गुन्हे अन्वेषणने दिल्लीत अटक केल्याची बातमी शनिवारी पहाटे येथे धडकताच जिल्ह्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले.
शहर, जिल्ह्यातील साडेसहाशेवर ठेवीदारांनी 250 कोटींपेक्षा अधिक रक्कम ‘डीएसके’मध्ये गुंतविल्याचा ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष बी. डी. किल्लेदार, अॅड. सत्यजित पवार यांनी दावा केला होता. प्रत्यक्षात 275 गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
दाखल केलेल्या तक्रारीनुसार 17 ते 18 कोटींची रक्कम कंपनीकडे अडकल्याचे निष्पन्न होत आहे, असे गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांनी सांगितले. ग्रुपविरुद्ध अजूनही तक्रार दाखल होऊ शकते. गुंतवणूकदारांनी गुन्हे अन्वेषण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर, या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल
गुंतवणूकदारांना पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी, पत्नी हेमंती व मुलगा शिरीश कुलकर्णीविरुद्ध पुणे, मुंबईसह कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात दि. 9 नोव्हेंबर 2017 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
तपासाधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे म्हणाले, डीएसकेच्या कोल्हापूर (टोप) व सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी ट्रान्स्फर वॉरंटसाठी कोर्टात अर्ज करण्यात येत आहे.