Tue, Apr 23, 2019 01:54होमपेज › Kolhapur › औषध दुकाने वाढली; गुणवत्ता ढासळली!

औषध दुकाने वाढली; गुणवत्ता ढासळली!

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 8:56PMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

जिल्ह्यात दिवसेंदिवस औषधे दुकानामध्ये वाढ होत असून गुणवत्ता मात्र ढासळताना दिसते आहे. औषध दुकानाचा परवाना एकाच्या नावे आणि चालवणारी व्यक्ती मात्र दुसरी अशीच परिस्थिती बहुतांशी ठिकाणी आहे. अनेक दुकानांत फार्मास्टच नाही. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्रास दुकानात औषधांची विक्री केली जाते. अशा गोष्टींकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने औषध दुकानातील गुणवत्तेचा दर्जा ढासळू लागला आहे. 

औषधनिर्मिती आणि विक्री यासंबंधीची शैक्षिणक पात्रता पूर्ण केलेल्या व्यक्तीला औषध दुकानासाठी परवानगी देण्याचा सरकारी नियम आहे. त्या दुकानात औषधे देणारी व्यक्ती ही फार्मसिस्ट म्हणजेच प्रशिक्षित असावी, असा कायदा आहे. मात्र, जिल्ह्यातील वीस ते पंचवीस टक्के किरकोळ औषधविक्रीच्या दुकानात फार्मासिस्ट नसल्याचे चित्र आहे. दुसर्‍या बाजूला फार्मसी या क्षेत्राचे शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थाची संख्या देखील वाढत आहे.जादा उत्पन्न मिळणारा व्यवसाय म्हणून विद्यार्थ्यांसह अनेकांनी या व्यवसायाला पसंदी दिली आहे. त्यामुळे पाच वर्षे औषध दुकानांची संख्या दुपटीने वाढली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात 3360 तर शहरात 360 किरकोळ औषधविक्रीची दुकाने आहेत. तर जिल्ह्यात सुमारे 450 औषधांचे होलसेल वितरक आहेत. हा परवाना मिळविण्यासाठी बी.एस्सी. ही किमान शैक्षणिक पात्रता गरजेची असते. तर किरकोळ विक्रीच्या दुकानासाठी कौन्सिलिंगचे प्रमाणपत्र पुरेसे असते. हे प्रमाणपत्र दुकानांच्या दर्शनी बाजूला लावले जाते. यावरून संबंधित दुकानातून विक्री केलेले औषध हे प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली विकले जात आहे, असा त्याचा अर्थ निघतो; पण प्रत्यक्षात दुकान चालविणारा एक आणि ज्याच्या नावे प्रमाणपत्र आहे. तो वेगळाच अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे.शहरातील काही दुकाने ही केवळ प्रमाणपत्राच्या आधारावर चालविली जातात अशी स्थिती आहे. 

औषध विक्रीच्या दुकानांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती, फार्मसीचे शिक्षण, प्रशिक्षण घेतलेली प्रशिक्षित व्यक्ती असेल तरच रुग्णांना व नातेवाईकांना बिनचूक औषधे मिळतील, असा सरकारचा यामागचा उद्देश आहे.औषध विक्री व्यवसायामध्ये मिळणारा फायदा लक्षात घेऊन नव्याने यामध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे नऊ फार्मसी कॉलेज कोल्हापुरात आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणक्षेत्राचा एक भाग असलेल्या फार्मसीचे शिक्षण घेणार्‍यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली.जिल्ह्यात 9 शिक्षण संस्था असल्याने दरवर्षी अनेक स्थानिक विद्यार्थी फार्मसीचे शिक्षण घेऊन बाहेर पडतात.यामधील काही विद्यार्थी नोकरीचा तर काही व्यवसाय निवडतात.त्यामुळे औषध दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

दुकानात खरेदी-विक्री करणारा कर्मचारी, फार्मसिस्ट असणे आवश्यक असतो; पण सध्या जिल्ह्यातील वाढी औषधविक्रीच्या दुकानामध्ये फार्मासिस्ट किती आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.औषध दुकानांना सरकारने नियमावली घालून दिलेली आहे. मात्र, तेही कागदावर असल्याचे दिसून येते. 

गुणवत्तेसाठी प्रयत्न 

कोल्हापूर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने एमएसपीसी च्या वतीने सभासदांसाठी पीसीसी कोर्स सुरू केला आहे.आतापर्यंत 1000 दुकानदारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. वेळोवेळी असोसिएशनच्या वतीने मार्गदर्शनही केले जात आहे. त्यामुळे निश्‍चितच गुणवत्ता सुधारेल, अशी प्रतिक्रिया असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.