Sun, May 26, 2019 19:50होमपेज › Kolhapur › औषध घोटाळा : वित्त विभाग कर्मचार्‍यांचीही होणार चौकशी

औषध घोटाळा : वित्त विभाग कर्मचार्‍यांचीही होणार चौकशी

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:32AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गाजत असलेल्या औषध घोटाळा प्रकरणात वित्त विभागातील कर्मचार्‍यांचीही आता चौकशी होणार आहे. त्यामुळे वित्त विभागातील कर्मचारी संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने कमी दराची औषधे जादा दराने खरेदी करून त्यात घोटाळा केल्याचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी सुरू केली. जिल्हा परिषदेच्या सर्वसधारण सभेतही या घोटाळ्यावर चर्चा झाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश असेल त्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली होती. चौकशीसाठी डॉ. उषादेवी कुंभार यांची निवड समिती स्थापन करण्यात आली. यात आणखी दोन अधिकार्‍यांचा समावेश होता. 

पहिल्या टप्प्यात फक्‍त आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांचीच चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पाटील राज्य शासनाचे अधिकारी असल्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी आरोग्य उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. तातडीची कारवाई म्हणून त्यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आरोग्य उपसंचालकांनी पुढील चौकशीसाठी हा प्रस्ताव आरोग्य संचालकांना पाठविला. औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगुले यांनाही जिल्हा परिषदेने सक्‍तीच्या रजेवर पाठविले. जादा किमतीच्या खरेदी करण्यात आलेल्या औषधांच्या पावत्या तपासण्यात आल्या.

यात वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाला वाटू लागले. त्यामुळे वित्त विभागातील अधिकार्‍यांचीही चौकशी करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्‍ती वाढण्याची शक्यता आहे.जादा दराने खरेदी केलेल्या औषधांची बिले देताना ती वित्त विभागात कोणी तपासली, त्यावर कोणा-कोणाच्या सह्या आहेत. याची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे वित्त विभागातील कर्मचार्‍यांचेही धाबे दणाणले आहेत.