Tue, Jun 18, 2019 23:28होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : चालकाच्या चुकीने अपघात?

कोल्हापूर : चालकाच्या चुकीने अपघात?

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 30 2018 11:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पुलावर प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघातातील टेम्पो ट्रॅव्हलर नवीनच असल्याने या अपघातात वाहनाचा दोष नसल्याचे दिसून येते. त्यामुळे हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची शक्यता प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या तपासणी अहवालात व्यक्‍त करण्यात आली आहे. तर चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्याचा आरटीओ अधिकारी शोध घेत आहेत. दरम्यान, या अपघात प्रकरणात काही धक्‍कादायक माहिती पोलिस तपासात पुढे येण्याची शक्यता आहे. 

पुण्यातील बालेवाडीतील केदारी कुटुंबातील सदस्य गणपतीमुळे दर्शनासाठी आले होते. गणपतीपुळ्याहून परतत असताना शिवाजी पुलावर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कठडा तोडून टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. अपघातग्रस्त वाहनाची सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांनी सविस्तर तपासणी केली.  शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात ही ट्रॅव्हलर ठेवण्यात आली आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हलरचा चक्‍काचूर झाल्याने ती चालविण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगण्यात आले. ट्रॅव्हलर चालविता येत नसल्याने तांत्रिक अहवालात स्पष्ट अभिप्राय देता येत नसल्याचे म्हटले आहे.

या तपासणीत ही ट्रॅव्हलर ऑगस्ट 2017 मध्ये नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच ट्रॅव्हलर नवीनच असून केवळ पाच ते सहा महिने झाले आहेत. त्यात तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असते. त्यामुळे ट्रॅव्हलरचा तांत्रिक दोष असण्याची शक्यता फारच कमी असल्याचे सांगण्यात येते. अपघातग्रस्त ट्रॅव्हलर पूर्णपणे तुटलेली आणि मोडतोड झालेली असल्याने ती प्रत्यक्ष चालवून निरीक्षण नोंदविता येत नाही. त्यामुळे तुटलेले पार्ट अपघातापूर्वी तुटले आहेत की, अपघातामुळे ट्रॅव्हलर कोसळल्याने दगडावर आदळल्याने ते तुटले आहेत, याबाबत निरीक्षण नोेंदविणे अशक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अपघातग्रस्त वाहनाची नोंद ऑगस्ट 2017 मध्ये पुणे येथे झाली आहे. या वाहनाच्या मालकाशी आरटीओ अधिकार्‍यांनी संपर्क साधला असता तो तपासास सहकार्य करीत नसल्याचे समजते. आरटीओ कार्यालयातील रेकॉर्डनुसार बसचालक महेश लक्ष्मण कुचेकर हा 23 वर्षांचा असून तो मूळचा कुर्डुवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील आहे. त्याने शिकावू लायसनसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यापुढील कोणतीही प्रक्रिया त्याने पूर्ण केली नसल्याचे आरटीओ रेकॉर्डवरून समोर आले आहे. त्यामुळे या चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स होते का नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

प्रवाशांनी खबरदारी घ्यावी

प्रवासी आणि नागरिकांनी सार्वजनिक वाहन भाड्याने घेताना त्या वाहनाचे परमिट, वाहनाची स्थिती, चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स व बॅज याची खातरजमा करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी केले आहे. शिवाजी पूल ट्रॅव्हलर अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर हे आवाहन केले आहे.