Fri, Aug 23, 2019 15:30होमपेज › Kolhapur › कोल्हापूर अपघात : चालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्‍न

कोल्हापूर अपघात : चालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्‍न

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी पुलावर शुक्रवारी (दि. 26) झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या महेश लक्ष्मण कुचेकर या चालकाने मद्यप्राशन केल्याचे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याच्या रक्‍त तपासणीचा अहवाल रात्री उशिरा करवीर पोलिसांना उपलब्ध झाला. अहवालात चालकाच्या रक्‍तात अल्कोहोलचा अंश असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

अपघात नेमका कशामुळे झाला, याची गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू होती. चालकाची डुलकी की तांत्रिक बिघाड, यावर तर्कवितर्क लढविले जात असतानाच फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात चालकाच्या रक्‍तात अल्कोहोलचा अंश असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. गणपतीपुळे येथे नवस फेडून परतणार्‍या बालेवाडीतील भाविकांची ट्रॅव्हलर शुक्रवारीशिवाजी पुलावरून कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकार्‍यांनी चालकाचाच निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका मंगळवारी दिलेल्या अहवालात दिला आहे. अपघाताच्या तांत्रिक कारणांचा शोध घेण्यासाठी मंगळवारी प्रात्यक्षिकेही घेण्यात आली होती. यामध्ये तांत्रिक दोष न आढळल्याने चालकच जबाबदार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. आरटीओ अधिकारी व तपासी अधिकार्‍यांनी घटनास्थळ, ट्रॅव्हलर व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नव्याने तपासणी करून अहवाल बनविला. हा अहवाल बुधवारी करवीर पोलिसांना मिळाला.

मृत चालक महेश कुचेकरच्या रक्‍ताचे नमुने आणि व्हिसेरा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. बुधवारी रक्‍ताच्या नमुन्याचा अहवाल पोलिसांना प्राप्‍त झाला. त्यामध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले.