होमपेज › Kolhapur › पेयजल योजना घोटाळा :  50 जणांवर लवकरच फौजदारी

पेयजल योजना घोटाळा :  50 जणांवर लवकरच फौजदारी

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:55AMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्ह्यात सात-आठ वर्षापासून गाजत असलेल्या शिरोळ तालुक्यातील मौजे लाटवाडी, शिरदवाड व मौजे शिवनाकवाडी येथे राबविण्यात आलेल्या ग्रामीण पेयजल योजनेच्या कामात घोेटाळा झाल्याचे निदर्शनास आल्याने या तीन ग्रामपंचायतींमधील पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांसह 50 जणांवर  फौजदारी करण्यासाठी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली आहे. हा प्रस्ताव विधी विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील जनता अजूनही मुलभुत सुविधांपासून वंचित असून पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षापासून पाण्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. पुर्वी जलस्वराज्य प्रकल्प नावाने ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासाठी योजना राबविण्यात येत होती. त्यानंतर ग्रामीण पेयजल नावाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेतत मौजे लाटवाडी (ता. शिरोळ)  येथे 2008-09 मध्ये पाऊण कोटीची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. मात्र या योजनेच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशी अधिकार्‍यांनी आपला अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. यामध्ये कामापेक्षा  अधिक तसेच काम पूर्ण होण्यापुर्वीच ठेकेदाराला रक्‍कम दिल्याचे तसेच पाईपलाइंनचे काम करत असताना काही  ठिकाणी पाईपच टाकण्यात आली नसल्याचे आढळून आले. मौजे शिरदवाड (ता. शिरोळ) गावालाही 2 कोटी 75 लाखाची नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेतही ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षाला हाताशी धरून घोटाळा करण्यात आला. या योजनेच्या चौकशी अहवालात फौजदारी करण्याबरोबरच रक्‍कम वसूल करावी, असेही म्हटले आहे. या योजनेला दहा वर्ष झाली तरी ठेकेदाराने जॅकवेलच्या ठिकाणी पंंपीग मशिनरीचे काही काम केलेले नाही. तसेच जॅकवेल व पंपघरासाठी आवश्यक असणारी शिडी बसविण्यात आली नसल्याने याठिकाणी केलेल्या कामाची मापे घेता आली नाहीत. 

शिवनाकवाडीसाठीही 2008-09 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत गावासाठी 2 कोटी 27 लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. याठिकाणीही ठेेकेदाराला काम पूर्ण होण्यापुर्वी रक्‍कम दिल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे.या तीन पाणी  योजनेतील घोटाळ्यासाठी लाटवाडीमध्ये 19, शिरदवाडमधील 14 आणि शिवनाकवाडीतील 18 जणांना फौजदारी दाखल करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

घोटाळा झालेल्या वरील तीन गावातील पाणी पुरवठा योजनेचे काम कृष्णात दुुर्गाप्पा पोवार या एकाच ठेकेदाराला देण्यात आले आहे. तसेच तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून कृष्णात डी. बुराण या एकाच व्यक्‍तीने काम पाहिले आहे. त्यांनाही   नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.