Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Kolhapur › आम्हाला, कोणी घर देता का घर?

आम्हाला, कोणी घर देता का घर?

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 1:05AMआजरा : ज्योतिप्रसाद सावंत

आजरा शहराची भौगोलिक व नैसर्गिक संपन्नता,  मुबलक पाणी यामुळे नोकरदार, छोटे-मोठे व्यावसायिक आजरा शहरात स्थिरस्थावर होऊ लागले आहेत. त्यामुळे शहरातील जागांची मागणी  वाढली आहे.  त्यामुळे गोरगरिबांचे घराचे स्वप्न दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. 

 गेल्या 20 वर्षांपासून झपाट्याने आजर्‍याच्या उपनगरात वाढ होऊ लागली आहे. शहरामध्ये जागांचे दर लाखांच्या घरात आहेत. आजरा शहरामध्ये नुकताच महसूल विभागाकडून गांधीनगर गायरानमधील 16 भूखंड लिलाव पद्धतीने विकण्यात आले. महसूल उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने ही प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पार पडली. शंभरवर गरजू मंडळींनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. या भूखंडांच्या लिलावाच्या किमती पाहून सामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. जर शासकीय भूखंडांची अवस्था अशी असेल तर खासगी जागांची अवस्था, त्यांचे दर याची कल्पना करणेही आवाक्याबाहेरचे ठरत आहे. 

आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता शहरामध्ये अपार्टमेंट संस्कृतीचाही प्रवेश होऊ लागला आहे. येथील सदनिकांचे दरही सामान्यांना परवडणारे निश्‍चितच नाहीत.शहरालगत असणार्‍या गावामधील जागांना शहरात असणार्‍या जागा टंचाईमुळे आता महत्त्व येऊ लागले आहे. यामुळेच बुरुडे, सावरवाडी, मेंढोली, पारेवाडी या शहरालगत असणार्‍या गावांमधीलही जमिनी बिगर शेती होऊ लागल्या आहेत. 

आजरा शहराजवळून रेड्डी-संकेश्‍वर राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याने ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे. त्या भागातीलही जागा आता बिगरशेतीच्या दृष्टीने वाटचाल करू लागल्या आहेत. 
प्रक्रियेबाबत नाराजीचा सूर

गुरुवार (दि. 18) महसूल विभागाकडून झालेल्या 16 भूखंडांच्या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊनही लिलावातील बोली आवाक्याबाहेरची असल्याने गरजूंकडून या प्रक्रियेबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. लिलावातील रकमा पाहता जागा घेण्यासाठी आलेल्या अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आलेले स्पष्टपणे जाणवत होते. महसूल विभागाने गरजूंना हे भूखंड देणे आवश्यक असतानाही केवळ सर्वोच्च बोली हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून केलेला भूखंडाचा लिलाव गरजूंचे स्वप्न भंग करणारा ठरला आहे.