Thu, Jul 18, 2019 00:54होमपेज › Kolhapur › डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा हुपरी नगरपालिकेच्या सभेत ठराव 

डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा हुपरी नगरपालिकेच्या सभेत ठराव 

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 30 2018 1:03AMहुपरी : वार्ताहर

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव शुक्रवारी हुपरी नगरपालिकेच्या सभेत करण्यात आला. हा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठ होत्या. पक्षप्रतोद भरतराव लठ्ठे यांनी हा ठराव मांडला. त्यास नगरसेवक दौलतराव पाटील यांनी अनुमोदन दिले.

दै. ‘पुढारी’ हा महाराष्ट्राच्या विकासाचा भागीदार आहे. संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी संपूर्ण देशातील राजकारण्यांवर जबरदस्त पकड ठेवली आहे. राज्याला त्यांच्या अभ्यासू विचारांचा लाभ व्हावा यासाठी डॉ. योगेश जाधव यांना हे सन्मानपूर्वक पद दिले आहे. त्यामुळे देशात चांदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरी शहराच्या पालिकेतर्फे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडल्याचे पक्षप्रतोद लठ्ठे यांनी सांगितले. 

मराठा समाज आरक्षणाला पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव यावेळी करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचा नंबर एक ब्रँड पुरस्कार मिळवलेले चांदी उद्योजक राजेंद्र शेटे, माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांच्याही अभिनंदनाचा ठराव यावेळी मांडण्यात आला. पक्षप्रतोद सूरज बेडगे, नगरसेवक गणेश वाईंगडे यांनी हे ठराव मांडले.

हुपरी शहरातील दिवाबत्ती व कचरा समस्या सांडपाणी व्यवस्था यांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. नागरिकांना बांधकाम व व्यवसाय परवानाही दिला जात नाही. गंभीर आरोप असलेले व न्यायप्रविष्ट प्रकरणाचा ठपका असणार्‍या कर्मचार्‍यांना  सेवेत सामावून घेतल्याप्रकरणी सभेत वादळी चर्चा झाली. यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकारी तानाजी नरळे यांना धारेवर धरले.

सर्वसामान्यांची कामे करताना मुख्याधिकारी कायद्यावर बोट ठेवतात. त्यामुळे संताप व्यक्‍त करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत विविध ठराव झाले असताना एकही भरीव स्वरूपाचे विकासकाम करण्यात आलेले नाही. मुख्याधिकारी यांनी याबाबत कोणता पाठपुरावा केला, ही कामे का झाली नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.