Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › विद्यार्थ्यांनी कृतिशील शिक्षणाची कास धरावी

विद्यार्थ्यांनी कृतिशील शिक्षणाची कास धरावी

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 10 2018 12:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनी 21 शतकातील आव्हानांना सामोरे जाताना कृतिशील शिक्षणाकडे वळताना संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरली पाहिजे. सुप्त कौशल्य गुणांचा शोध घेऊन त्यांचा विकास करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

शिवाजी विद्यापीठात इंग्रजी अधिविभागामार्फत ज्ञानविस्तार व्याख्यानमालेंतर्गत  ‘करिअरचा मार्ग कसा निवडाल?  पायवाट की आडवाट?’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षथानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. डॉ. विद्यासागर म्हणाले, जागतिक पातळीचा विचार करताना विद्यार्थ्यांनी विचारांची प्रगल्भता वाढविली पाहिजे. विज्ञान क्षेत्राबरोबरच भाषेच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आवाका वाढविल्यास अगणित संधी निर्माण होतील. करिअर निवडताना कोणाच्या सांगण्यावरून करिअर निवडू नका स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा. तुम्ही जेव्हा नकारात्मतक विचार अंगीकारत नाही त्यावेळेस तुमची यशाकडे वाटचाल होत असते. विविध आव्हानांना तोंड देताना विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी वेळेचे नियोजन काटेकोरपणे केले पाहिजे. विपरीत परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी संशोधनात्मक वृत्ती जोपासली पाहिजे.  

प्र-कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यामधील क्षमता ओळखून करिअरची निवड करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये, उपलब्ध अभ्यासक्रम आत्मसात करून घेतले पाहिजेत. इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ.सी.ए.लंगरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए.एम. सरवदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी.बी. माने यांनी आभार व्यक्त केले. यावेळी मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस, अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव यांच्यासह विविध अधिविभागातील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.