होमपेज › Kolhapur › डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार

Published On: Jan 12 2019 1:49AM | Last Updated: Jan 13 2019 1:37AM
गडहिंग्लज : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीतील अमूल्य योगदान तसेच गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथे त्यांच्या दातृत्वातून उभारलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील सर्वपक्षीय व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज रविवारी (दि. 13) नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. 

दसरा चौकातील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी दहा वाजता हा सोहळा  होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांच्या हस्ते व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला आ. हसन मुश्रीफ, आ. संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील नूलमध्ये डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या दातृत्वातून उभारलेल्या शैक्षणिक संकुलामुळे पूर्व भागातील शिक्षणाची समस्या संपुष्टात आली आहे. यासाठी त्यांचा नागरी सत्कार व्हावा, अशी अपेक्षा गडहिंग्लज उपविभागातील शैक्षणिक व्यासपीठांची होती. यामध्ये गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, सभापती विजयराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय सत्कार करण्याचे नियोजन केले. 

याबाबत बैठक 13 डिसेंबर रोजी पार पडली होती. बैठकीला तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी डॉ. जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्याचे नियोजन केले होते. त्यांचा सत्कार तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते करण्याचे ठरले होते. यानुसार निमंत्रण समितीच्या सदस्यांनी आ. हसन मुश्रीफ व आ. संध्यादेवी कुपेकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. 

खा. पवारांनी तत्काळ या कार्यक्रमास येण्यास होकार दिला. याबरोबरच या कार्यक्रमासाठी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याबाबत सत्कार समितीच्या निमंत्रक तथा नगराध्यक्षा स्वाती कोरी, सभापती विजयराव पाटील यांनी कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार असल्याने सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

सत्कार समितीकडून जय्यत तयारी

डॉ. जाधव हे पहिल्यांदाच गडहिंग्लज शहरामध्ये सत्काराच्या निमित्ताने येत असून, खा. शरद पवार, डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह प्रमुखांच्या उपस्थितीत होत असलेल्या या सोहळ्याची सत्कार समितीकडून जय्यत तयारी सुरू आहे. बॅ. नाथ पै विद्यालयाच्या पटांगणावर हा सोहळा पार पडणार आहे. या ठिकाणी भव्य शामियाना उभारून सोहळा दिमाखदार करण्यासाठी सत्कार समिती अहोरात्र कष्ट घेत आहे.

गडहिंग्लज पालिकेचा पुढाकार....

दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार करण्याची संधी गडहिंग्लज पालिकेला मिळाली असल्याची भावना व्यक्त करत पालिकेच्या पदाधिकार्‍यांनी या सत्कार सोहळ्यासाठी पुढाकार घेत भव्य मंडप उभारणीसह कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले आहे. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच शैक्षणिक व्यासपीठाच्या सहभागातून हा सोहळा दिमाखदार करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.