Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Kolhapur › डॉ. पी. एस. पाटील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये!

डॉ. पी. एस. पाटील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये!

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:53PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक, स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे समन्वयक,  विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील मटेरियल सायन्स विषयाच्या संशोधनात भारतातील सर्वोत्कृष्ट  दहा (टॉप टेन) शास्त्रज्ञांमध्ये गणले गेले आहेत. 

‘करिअर-360’ या शैक्षणिक संस्थेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांची ही निवड करण्यात आली. तसेच संस्थेकडून त्यांना या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संशोधक अध्यापक पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.डॉ. पाटील यांनी सौर घट, गॅस सेन्सिंग, सुपरकपॅसिटर या क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भरीव कामगिरी केली आहे. प्रा. पाटील व त्यांच्या चमूला सौर घटाची कार्यक्षमता वाढविण्यामध्येही यश आले आहे.

प्रा.पाटील गेली 27 वर्षे मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात संशोधन कार्य करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 45 विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट प्राप्‍त केली आहे. आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे 435 शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांना 12,000 हून अधिक सायटेशन प्राप्‍त आहेत.  त्यांच्या संशोधन कार्याचा संदर्भ 12,000 हून अधिक संशोधकांनी त्यांच्या शोधनिबंधांमध्ये दिला आहे. त्यांच्या नावावर समाजोपयोगी पाच पेटंट  नोंद आहेत. त्यांचा एच इंडेक्स  56 असून आय टेन इंडेक्स 289 इतका आहे. त्यांचे संशोधन लेख 70 हजारहून अधिक शास्त्रज्ञ तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी अभ्यासले आहेत. त्यांच्या संशोधन क्षेत्रासंदर्भात त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. 

प्रा. पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे बागणी (ता. वाळवा) या छोट्याशा खेडेगावातून आलेल्या डॉ. सावंता माळी या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधाला ‘जगातील सर्वोत्कृष्ट प्रबंध’ (बेस्ट थेसिस इन द वर्ल्ड) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचे मार्गदर्शन लाभलेले जवळपास वीसहून अधिक विद्यार्थी आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, दक्षिण कोरिया, जपान, तैवान अशा अनेक देशांत संशोधन करीत आहेत.