Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Kolhapur › वीज दरवाढ लादल्यास याद राखा

वीज दरवाढ लादल्यास याद राखा

Published On: Jul 31 2018 1:31AM | Last Updated: Jul 31 2018 1:06AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पाच वर्षांत वीज दरवाढ करावयाची नाही, असे ठरलेले असताना काहीतरी कारण सांगून 22 टक्के वीज दरवाढ करण्यास निघाला आहात, पण आम्ही वीज ग्राहक आहोत, म्हणून तुमची कितीही किमतीची वीज खरेदी करणार नाही, यातून जर वीज दरवाढ लादण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, असा गंभीर इशारा देत वीज दरवाढ झाल्यास आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबून शेतकर्‍यांची ताकद दाखवून देऊ, अशी ताकीद प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी महावितरणला दिली.

वीज दरवाढीच्या निषेधार्थ, राज्य इरिगेशन फेडरेशन, घरगुत्ती वीज ग्राहक संघटना, औद्योगिक वीज ग्राहक संघटना यासह अन्य संघटनांच्या वतीने महावितरणच्या नवीन प्रस्तावाच्या परिपत्रकाची सोमवारी दुपारी महावितरणच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर होळी करण्यात आली. यावेळी रद्द करा, रद्द करा, वीज दरवाढ रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या. महापौर सौ. शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत यांच्यासह अन्य नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 

महावितरणने जी प्रस्तावित वीज दरवाढ सुचवली आहे, ती आम्ही फेटाळून लावत आहोत, असे सांगून प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, महावितरणची वीज घेणे ग्राहकाला बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे महावितरणची वीज घेतो. पण, वीज दरवाढ का करतोय, हे महावितरणने आम्हाला पटवून देण्याची गरज होती. पण, ग्राहकांचा कोणताही विचार न करता दरवाढ करून त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे पाठवला आहे. पण, आम्ही हरकतीच्या माध्यमातून आयोगाला जे उत्तर द्यावयाचे ते देऊ, पण वीज देता म्हणजे आमच्यावर मेहरबानी करत नाही. त्यामुळे वीज दरवाढ करताना शेतकरी, सामान्य ग्राहक यांचा विचार व्हावयास हवा होता, पण महावितरणने ते केलेले नाही. त्यामुळे वाढीव दराने आम्ही वीज घेणार नाही. यातून लादण्याचा प्रयत्न केल्यास, आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबून शासन आणि महावितरणला नमते घेण्यास भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच 31 जुलै रोजीपर्यंत हरकती दाखल करावयाच्या आहेत, त्यानंतर त्या हरकतीवर 9 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तेथेही विरोध केला जाईल, असे प्रा. पाटील यांनी सांगितले. 

आ. चंद्रदीप नरके म्हणाले, मागील वेळी महावितरणने तुटीची बिले शेतकर्‍यांना दिली होती, त्यावेळी शेतकर्‍यांची तुटीची बिले माफ करा, किंवा त्या बिलांची दुरुस्ती करा, अशी मागणी आपण विधिमंडळात केली होती. यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुरुस्ती करू, असे आश्‍वासन दिले होते. पण, त्याची  पूर्तता झालेली नाही. त्यानंतर आता वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. यावरून या सरकारने शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दोन दिवसांत आपण आणि शाहूवाडीचे आ. सत्यजित पाटील यांच्यासह जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येईल, तसेच वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी विनंती करण्यात येईल. 

आ. सत्यजित पाटील म्हणाले, विविध अडचणीमुळे शेतकर्‍यांना शेती परवडेनासे झाले आहे. त्यात वीज दरवाढीमुळे शेतकरी अडचणीत येणार आहे, सध्या आम्ही सरकारमध्ये  असलो तरी ही वीज दरवाढीला आमचा तीव्र विरोध राहील. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, कुमार जाधव यांची भाषणे झाली. प्रास्ताविक  इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.