Thu, Aug 22, 2019 12:34होमपेज › Kolhapur › ग. गो. जाधव सांस्कृतिक भवनचा ठराव मंजूर

ग. गो. जाधव सांस्कृतिक भवनचा ठराव मंजूर

Published On: Mar 20 2018 1:48AM | Last Updated: Mar 20 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावाने कोल्हापुरात अत्याधुनिक सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे. त्याद्वारे कोल्हापूरच्या या सुपुत्राचा यथोचित सन्मान व्हावा, असा ठराव सोमवारी झालेल्या महासभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या. आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी प्रमुख उपस्थित होते.

महासभेत सादर झालेल्या ठरावात म्हटले आहे की, ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात ते महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत लढ्यात सक्रिय सहभागी झाले होते. 20 एप्रिल 1930 रोजी गुजरातेतील कराडे-मतवाड येथे महात्मा गांधी यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी महात्माजींचा लेखी संदेश त्यांनी मिळवला. त्यामुळे बहुजन समाजातील नेते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी आंदोलनाच्या काळात, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

5 सप्टेंबर 1943 रोजी दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्काराप्रीत्यर्थ सभा झाली. त्या सभेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेनुसार ‘पुढारी’कार ग. गो. जाधव यांनी भुषविलेे होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरच मामा वरेरकर, संदेशकार अच्युतराव कोल्हटकर, ना. भास्करराव जाधव, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्या विविध चळवळी, सहवास व सहकार्य यातून ‘पुढारी’कारांचे समृद्ध व्यक्‍तिमत्त्व  आकाराला आले.

ग. गो. जाधव यांनी 1937 मध्ये साप्‍ताहिक स्वरूपात ‘पुढारी’ सुरू केला व 1939 मध्ये त्याचे दैनिकात रूपांतर केले. पत्रकारितेच्या या रोपाचे आज एका महान वृक्षात रूपांतर झाले आहे. 1949 साली त्यांनी तत्कालीन मुंबई असेम्ब्लीत आमदार म्हणून काम पाहिले. ‘पुढारी’च्या माध्यमातून अनेक सार्वजनिक चळवळींना त्यांनी बळ दिले व पाठपुरावा केला.
संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्‍ती लढा, कोयना धरणाची उभारणी आणि कोल्हापूर, सांगली परिसरात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे व सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करण्यात ग. गो. जाधव यांचा मोलाचा वाटा आहे.

गोवा मुक्‍ती संग्रामाची पहिली तुकडी ‘पुढारी’च्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयातून रवाना झाली. ग. गो. जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर महापालिकेने 28 मे 1982 रोजी समाजसुधारक संपादक म्हणून मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली पाहिजे, असा लेख त्यांनी 1936 साली ‘सेवक’ या साप्‍ताहिकात लिहिला होता. पुढे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, त्यांनतर याच विद्यापीठाने भूतपूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली. 29 मे 1982 रोजी ग.  गो. जाधव यांचा अमृत महोत्सव कोल्हापूरच्या तमाम जनतेच्या वतीने साजरा करण्यात आला.

या भव्यदिव्य समारंभाला माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील, ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेेब गोरे यांच्यासह देश व राज्य पातळीवरील सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते.  1984 मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ बहाल केली. त्याखेरीज त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही लाभले आहेत. ग. गो. जाधव जन्मशताब्दीचे औचित्य साधून, भारतीय डाक विभागाने ग. गो. जाधव यांच्या स्मरणार्थ एक खास पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. या तिकिटाचा विमोचन समारंभ तत्कालीन महामहीम राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांच्या सन्माननीय उपस्थितीत, तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, इतर मंत्री व केंद्रीय मंत्री अशा प्रमुख व्यक्‍तींच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनमध्ये दि. 18 नोव्हेंबर 2009 रोजी झाला. ग. गो. जाधव यांच्या समाजाभिमुख कार्याची व समाजसेवेची पावतीच जणू त्यांना देण्यात आली.

तसेच नुकत्याच कोल्हापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या दैनिक ‘पुढारी’च्या अमृत महोत्सवावेळी दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक (कै.) पद्मश्री पत्रकार डॉ. ग. गो. जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमामध्ये मा. नामदार नरेंद्र मोदीजी यांनी (कै.) पद्मश्री पत्रकार डॉ. ग. गो. जाधव यांच्या सामाजिक कार्याचा यथोचित गौरव आपल्या भाषणामध्ये केला.

कोल्हापूर महापालिकेकडून शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरातील सर्व्हे नं. 206/89 या जागेवर सांस्कृतिक सभागृह उभारण्याचा मनोदय आहे. त्याचा विस्तृत आराखडा तयार आहे. या विस्तृत आराखड्यासहीत कोल्हापूर महापालिकेने राज्य शासनाकडे जागा मागणी करणारा प्रस्ताव तयार केला आहे; पण कोल्हापूर महापालिकेकडे योग्य तो पाठपुरावा करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे व याचा पाठपुरावा न केल्यामुळे या प्रकरणावर कार्यवाही झालेली नाही. जर दैनिक ‘पुढारी’ने याप्रकरणी लक्ष घातले, तर महापालिकेचा हा मनोदय पूर्णत्वास जाऊ शकतो.

यामुळे महापालिकेला कायमस्वरूपी ठोस उत्पन्‍नाचे साधन उपलब्ध होऊ शकते. कोल्हापूर शहरवासीयांना नवीन अत्याधुनिक सांस्कृतिक भवनचा लाभ होऊ शकतो. तसेच ‘पुढारी’कार डॉ. ग. गो. जाधव यांच्यासारख्या कोल्हापूरच्या सुपुत्राचा यथोचित सन्मान करण्याची संधी कोल्हापूर महापालिकेला मिळू शकते. म्हणून पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावे सुसज्ज व प्रशस्त असे सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, असा ठराव एकमताने मंजूर करून तो राज्य शासनाकडे तातडीने पाठविण्यात यावा. काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता किरण शिराळे यांनी हा ठराव मांडला. उपमहापौर सुनील पाटील, सभागृह नेता प्रवीण केसरकर, शिवसेना गटनेता नियाज खान यांनी अनुमोदन दिले.
 

tags : Kolhapur,news,Dr, Ganpatrao, Govindrao, Jadhav, cultural, building, resolution, approved,