होमपेज › Kolhapur › डॉ. अरुण पाटीलसह चौघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ 

डॉ. अरुण पाटीलसह चौघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवस वाढ 

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:46AMइचलकरंजी : प्रतिनिधी

नवजात अर्भक विक्रीप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या अटकेत असलेल्या डॉ. अरुण पाटील, सौ.उज्ज्वला पाटील, अनिल चहांदे, सौ. प्रेरणा चहांदे यांची पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. 

अर्भक विक्री प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी संशयित चौघांना अटक केली होती. त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती.  
सरकारी वकिलांनी पोलिस तपासासाठी आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. चहांदे याने कुमारी मातेला दोन लाख रुपये दिले होते. हे दोन लाख रुपये त्याने कोठून आणले, त्याने आणखी काही पैसे डॉ. पाटील याला दिले आहेत का, कुमारी मातेने पतसंस्थेत ठेवलेल्या दोन लाख रुपयांच्या ‘एफडी’ला अज्ञान पालक म्हणून डॉ.पाटील याचे नाव आहे. 

कुमारी मातेचे नातेवाईक असताना डॉ. पाटील याने अज्ञान पालक म्हणून नाव का लावले, याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायमूर्तींनी चौघांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. पोलिसांनी डॉ. पाटील याच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. त्यातील काही बँक खात्यांची माहिती पोलिसांच्या हाती मिळाली आहे. या खात्यावर संशयास्पद कोणते व्यवहार आहेत का, याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.