Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Kolhapur › डॉ. आंबेडकर जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार : ना.पाटील

डॉ. आंबेडकर जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार : ना.पाटील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव यंदा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून यानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवन आणि  कार्यावर आधारित प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्याचा भीमवंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक चित्ररथ तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि संवेदना सोशल फौंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने 14 एप्रिल या जयंतीदिनी  कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी सर्किट हाऊस येथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. 

ना. पाटील म्हणाले, भीमवंदना हा कार्यक्रम 4 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता  शिवाजी स्टेडियमवर होईल. याच्या मोफत प्रवेशिका वितरित केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण 14 एप्रिल रोजी संपूर्ण देशभर झी टॉकीज व झी युवा चॅनेलच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जाणार आहे. डॉ.  आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित  चित्ररथ जिल्ह्यातील बहुतांशी गावात फिरविला जाणार आहे. या रथाद्वारे  त्यांच्या विचारांचा संदेश पोहोचविला जाणार आहे. 

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यासाठी 113 कोटींची तरतूद केली असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री  पाटील म्हणाले, या निधीतून दलित वस्त्यातील रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी या गोष्टींना प्राधान्य दिले जाईल. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी सुमारे 44 कोटी निधी दिला जाईल. यामध्ये ग्रामीण भागातील वस्त्यांसाठी 30 कोटी तर नागरी भागातील वस्त्यांसाठी 14 कोटी उपलब्ध करून दिले जातील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस स्टेशन (जुने) परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही ना. पाटील यांनी दिली. या बैठकीत डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती पदाधिकारी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सूचना केल्या. बैठकीस समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्‍त बाळासाहेब कामत, जि.प. समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, गोकुळचे संचालक बाबा देसाई, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे  आदी मान्यवर  उपस्थित होते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Dr. Ambedkar Jayanti, celebrate, peoples festival 


  •